उपराजधानीला पावसाने झोडपले : १०८ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:04 PM2020-07-15T23:04:17+5:302020-07-15T23:07:12+5:30

हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरला व मंगळवारी रात्री शहराला पावसाने अक्षरश: झोडपले. मंगळवार सकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात १०८.९ मिमी पावसाची नोंद झाली.

Uparajdhani was lashed by rains: 108 mm of rain | उपराजधानीला पावसाने झोडपले : १०८ मिमी पाऊस

उपराजधानीला पावसाने झोडपले : १०८ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देरात्री धुवाधार, सखल भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरला व मंगळवारी रात्री शहराला पावसाने अक्षरश: झोडपले. मंगळवार सकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात १०८.९ मिमी पावसाची नोंद झाली. रात्रभरातच शहरात सुमारे ९० मिमी पावसाची नोंद झाली. ६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस हा अतिवृष्टीमध्ये गणला जातो हे विशेष. धुवाधार आलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले. तर बऱ्याच वस्त्या तर दिवसभरदेखील जलयमच होत्या.
मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर काही वेळाची विश्रांती घेतल्यानंतर परत पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, काटोल येथे दमदार पाऊस बरसला.

पाऊस कायम राहणार
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस शहरात कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर जास्त राहू शकतो.

अनेक वस्त्यांमध्ये पाणी
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. यात मनीषनगर, सोनेगावचा काही भाग, नाल्यांकाठच्या वस्त्या यांचा समावेश होता. तर बेलतरोडी मार्ग, नरेंद्रनगर पुलाखाली, लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. मेडिकल चौक, बजाजनगर चौक, त्रिमूर्तीनगर, हुडकेश्वर, झिंगाबाई टाकळी येथेदेखील पाणी तुंबल्याचे दिसून आले.

झिंगाबाई टाकळी परिसरातील वस्त्यात शिरले पाणी


महापालिकेच्या अर्धवट सिमेंट रोडच्या कामामुळे गोधनी मार्गावरील झिंगाबाई टाकळी परिसरातील वस्त्यात पाणी शिरले. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रस्त्याचे काम महापालिकेच्या उदासीनतेमुळे कासवगतीने सुरू आहे. एका बाजूचा अर्धवट सिमेंट रोड तयार झाला आहे. हा सिमेंट रोड जमिनीपासून दोन फूट उंच आहे. त्यामुळे सिमेंट रोडच्या बाजूला खड्डा पडला आहे. पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी नालीही तयार करण्यात आली नसल्यामुळे पूर्ण पाणी वस्त्यात शिरले. अनेक वर्षांपूर्वी गोधनी मार्गावर शेती होत होती. नागरिकांनी शेती ले-आऊटवाल्यांना विकल्यानंतर या जागेवर प्लॉट पाडून ते विकण्यात आले. त्यावर नागरिकांनी घर बांधून शेतातील नाले
बुजविले. यामुळे पावसाचे पाणी वस्तीत शिरत आहे. नासुप्रने विकास करण्यासाठी ले-आऊटधारकांकडून विकास शुल्क जमा केले. परंतु पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था केली नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही सिमेंट रोडच्या कामाला गती आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी श्री कृष्ण सभागृह, कोहळे ले-आऊट, गिरे ले-आऊट, श्री प्रभूनगर, लक्ष्मीनगर, स्वामी समर्थनगर या वस्त्यात जमा होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही कारवाई करण्यात आली नाही. यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

जागोजागी साचले पावसाचे पाणी
अर्धवट सिमेंट रोड व नाल्या सफाई न केल्याने जागोजागी कचरा साचला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसात नागपूर शहरात जोराचा पाऊस झाला नसतानाही ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने जोराचा पाऊस झाला तर काय होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

त्रिमूर्ती नगरातील गजानन मंदिराकडे जाणारा रस्ता जलमय

त्रिमूर्तिनगर रिंग रोडपासून गजानन महाराज मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आवागमनासाठी महत्त्वाचा आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे जयताळ्याकडे जाणाºया नवीन रिंग रोडपासून गजानन महाराज मंदिराकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
या रस्त्याच्या कडेला दुकाने असून रस्त्याच्या डाव्या बाजूला गजानन महाराजाचे प्रशस्त मंदिर आहे. तसेच बाजूलाच शाळा व इतर व्यावसायिकांचे व्यवसायदेखील आहेत. मंदिरालगत फूल विकणाऱ्यांची दुकाने आहेत. मंगळवारी पावसाचे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साचले. मंदिराच्या मुख्य द्वारासमोरच पाणी साचल्याने नागरिकांना मंदिरात जाण्यास अवघड होत आहे. समोर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. रस्त्याच्या आजूबाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली ड्रेनेज सिस्टम चोकप झाली आहे. यामुळे पाणी तुंबत असल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या इतर भागातही अशीच अवस्था आहे. सिमेंट रोडचे बांधकाम उंच असून लगतचा निवासी भाग खाली असल्याने पाऊस आला की वस्तीत पाणी साचते. त्यात गडर लाईन व पावसाळी नाल्यांची सफाई झालेली नसल्याने पाणी तुंबल्याने रस्त्यावरून वाहते. ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार पसरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Uparajdhani was lashed by rains: 108 mm of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.