आगामी निवडणुका ईव्हीएमनेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:02 PM2018-08-07T22:02:10+5:302018-08-07T22:12:31+5:30

देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

The upcoming elections by only EVM | आगामी निवडणुका ईव्हीएमनेच

आगामी निवडणुका ईव्हीएमनेच

Next
ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचे संकेतलोकसभा व विधानसभा निवडणूक एकावेळी शक्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रावत मंगळवारी नागपुरात आले होते. रविभवनात पत्रकारांशी संवाद साधताना रावत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घ्यायच्या असेल तर संविधानात बदल करावा लागेल. समजा निवडणुका झाल्यास देशात एकाच वेळी ४५ लाख मशीन लागतील. आयोगाकडे १५ ते १६ लाख मशीन्स आहे. २३ लाख मशीन्सच्या आॅर्डर दिल्या आहेत. व्हीव्हीपॅट मशीन ३० सप्टेंबरऐवजी ३० नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. त्यानंतरही देशात एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही. ईव्हीएमने निवडणुका घेणे सुरक्षित आणि समस्यारहित आहे. भंडारा येथील लोकसभा निवडणुकीत जे घडले, त्यात ईव्हीएमची चूक नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेटने मतदान घेण्याची मागणी केली आहे. सर्व पक्ष भेटायला येणार आहेत. ते आल्यास त्यांच्या शंकांचे समाधान करून देणार आहे. त्यांच्याकरिता रविवारीसुद्धा आयोगाचे कार्यालय खुले राहील. ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शंका दूर करण्यासाठी गेल्यावर्षी आयोगाने राजकीय पक्ष, विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना मशीन हॅक करून दाखवावी, असे खुले आव्हान दिले होते. तेव्हा दोनच पक्षाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनीही केवळ शिकण्यासाठी आल्याचे सांगितले होते. मशीनबाबत लोकांमध्ये चिंता असून त्यावर जागरूकता आणण्याचा आयोग प्रयत्न करीत आहे. लगतच्या देशामध्ये बॅलेटने निवडणूक झाली. विरोधी पक्षांनी बॅलेटमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला. जगात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांचे बुकिंग घरबसल्या आॅनलाईन होत आहे. दिल्लीत बसून भोपाळ येथील प्रॉपर्टी टॅक्स आॅनलाईन भरण्याची सोय झाली आहे. ही सर्व कामे मिनिटात होतात. अशास्थितीत कुणीही तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे सोडून रांगेत लागून रेल्वे तिकीट काढण्याची मागणी करणार नाही, असे सांगून त्यांनी ईव्हीएम मशीनचे महत्त्व सांगितले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित होते.

ईव्हीएममध्ये गडबड शक्य नाही
 ईव्हीएमकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. या मशीनमध्ये गडबड करणे शक्य नाही. कुणीही यावे आणि समाधान करून घ्यावे. ईव्हीएमने २० ते २२ वर्षांपासून मतदान घेण्यात येत आहे. ही मशीन ०.५ ते ०.७ टक्के खराब होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट लावले होते. व्हीव्हीपॅट मशीन नवीन आहे. त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत आहेत, शिवाय या मशीनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीनमध्ये कंट्रोल सेन्सार बसविले आहे. आर्द्रतेमुळे पेपर जड होतो आणि चूक होते, असे रावत यांनी मान्य केले.

सोशल मिडियावरील खोट्या वृत्तावर बॅन
 रावत म्हणाले, निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणाºया खोट्या वृत्तांवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी सोशल मीडियावर निवडणूक संदर्भातील प्रसारित होणाºया खोट्या वृत्तावर बॅन लावण्याचा आयोगाचा विचार आहे. या संदर्भात सोशल मीडियाच्या अधिकाऱ्यांनी आयोगाच्या विचारावर सहमती दर्शविली आहे. आचारसंहितेबाबत रावत म्हणाले, ज्या राज्यात किंवा ज्या भागात पोटनिवडणूक असेल तिथेच आचारसंहिता राहील. काम करायचे असेल तर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा आयोगाने जाहीर करण्यापूर्वीच एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केली होती. या संदर्भात आयोगाने कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाची यंत्रणा सक्षम
एनआरसी ड्राफ्टच्या संदर्भात रावत म्हणाले, ड्राफ्टला अंतिम स्वरूप आल्यानंतर आसाममधील ४० लाख लोकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी देशाच्या नागरिकत्वाचे प्रमाण, त्याचे १८ वर्षे पूर्ण असावे आणि त्याला महिन्यांपासून राहत असलेल्या निवासाचा पत्ता द्यावा लागेल. बाहेरच्या देशातील नागरिक भारतात येतात, ही चिंतेची बाब आहे. पण देशाची यंत्रणा सक्षम आहे. काम करणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही, असे रावत यांनी स्पष्ट केले.

Web Title: The upcoming elections by only EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.