नागपुरात सारीच्या चाचणीसाठी अद्ययावत यंत्र उपलब्ध; एम्सचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:51 PM2020-07-04T21:51:46+5:302020-07-04T21:52:10+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चा रुग्ण कोविड निगेटिव्ह आल्यानंतरही काहींचे योग्य निदान होत नसल्याने मृत्यू होतो. याची दखल घेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे. ‘कोविड-१९’च्या तुलनेत सारी रुग्णांची संख्याही वाढत आहे. सारीच्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक राहत असल्याने प्रत्येक अशा रुग्णाची कोविड चाचणी केली जाते. परंतु अनेक रुग्ण कोविड निगेटिव्ह येतात. या रुग्णांच्या विषाणूचा किंवा जीवाणूचा शोध लागत नसल्याने योग्य उपचाराअभावी मृत्यूही होतो. विदर्भात याचे प्रमाण मोठे आहे.
एम्सच्या मायक्रोबायलॉजी विभागाचा प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ.विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात सारीच्या रुग्णाच्या निदानासाठी ‘बायोफायर फिल्मअरे’ हे अद्यायावत यंत्र खरेदी केले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मिश्रा म्हणाल्या, या अद्यायावत यंत्राच्या मदतीने सारीच्या रुग्णांमधील १८ जीवाणू व चार विषाणूंचा शोध लावणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णाला कोणत्या विषाणूमुळे किंवा जीवाणूची बाधा झाली आहे याचे निदान होऊ शकेल. अशा रुग्णाचे एकदा निदान झाल्यास त्यावर आवश्यक औषधोपचार करून जीव वाचविता येऊ शकतो.
या शिवाय, विदर्भात किंवा राज्यात आढळून येणारे सारीचे रुग्ण कोणत्या जीवाणू किंवा विषाणूचा संसर्ग झाला आहे, त्याचा शोध घेणेही शक्य होऊन मृत्यू रोखण्यास मदत होईल. एखादा जीवाणू कोणत्या अॅण्टीबायोटिकला रजिस्टन आहे, याचे निदानही हे यंत्र करते. यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या सारीच्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ नागपूर एम्समध्ये हे यंत्र उपलब्ध आहे, असेही त्या म्हणाल्या. या यंत्रावर एका रुग्णाचा चाचणी करण्यासाठी १२ हजार रुपयांचा खर्च येतो. नागपूर व अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी नागपूर विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी तर अमरावतीचे विभागीय आयुक्त पियूष सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने हे सुद्धा रुग्णांसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात येते.