धर्मामुळेच समाजाची उन्नती, सरसंघचालकांनी दिला तानाजी मालुसरेंचा दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:40 PM2023-02-14T13:40:15+5:302023-02-14T13:54:27+5:30
धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते.
नागपूर - संरसंघाचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात समाज आणि कुटुंब समजावून सांगताना धर्माचीही जोड दिली. यावेळी, इतिहासाचा दाखल देत तानाजा मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न सोडलं पण समाजकर्तव्य बजावण्यासाठी खिंड लढवल्याचं सांगितलं. धर्मामुळेच समाजाची उन्नती होते, असेही भागवत यांनी म्हटलं. तर, चीनच्या होत असलेल्या प्रगतीकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र, आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे.
आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते. तानाजी मालुसरे आपल्या मुलाचे लग्न सोडून आले नसते तर स्वराज्याचे काय झाले असते, त्यावेळी अशी घराणी होती, म्हणूनच औरंगजेब भारतात येऊन पण काही करू शकला नाही, असा दाखल भागवत यांनी दिला. औरंगजेब भारतात 30 वर्षे रहिला तरी काही करू शकला नाही, शेवटी त्याची कबर भारतातच बांधली गेली. याचा अर्थ असा परिवार, असा समाज, अशी व्यक्ती, असे कुटुंब, जे एकमेकांवर अवलंबून आहेत. कुटुंब आणि समाजाबद्दल समाजवताना धर्मामुळेच समाजाची उन्नती होत असल्याचेही मत भागवत यांनी व्यक्त केलं,
भारताने चीनच्या फार्मसी क्षेत्रापासून शिकावे
चीनच्या विविध भूमिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार प्रहार करण्यात येतो. मात्र सरसंघचालकांनी चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्राबाबत नागपुरात कौतुकोद्गार काढले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे. भारताकडे समृद्ध परंपरा असून भारतानेदेखील चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपुरात ते सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घालावी
चीनमध्ये पंरपरागत औषधोपचार आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालून एक वेगळी पद्धत निर्माण केली आहे. भारतीय फार्मसी क्षेत्राने चीन कडून हे आत्मसात करण्याची गरज आहे. फार्मसीचे क्षेत्र अतिशय चांगले असून या शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीवर अवलंबून रहावे लागत नाही. फार्मसीच्या ज्ञानावर स्वतःचा रोजगार करता येतो. आम्ही आमच्या परंपरागत ज्ञानाची या विज्ञानाशी सांगड घालू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आपण परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घातली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.