दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांविरोधात हायकोर्टातील याचिकेवरून गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:37 AM2023-10-19T11:37:14+5:302023-10-19T11:38:19+5:30
आंबेडकरी समाजाने व्यक्त केला संताप : २० जणांचा हस्तक्षेप अर्ज
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर रेल्वेने येणाऱ्या अनुयायांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरून वादळ उठले आहे. या याचिकेमुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड संताप पसरला असून, या याचिकेवर आक्षेप घेत २० जणांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.
ॲड. अविनाश काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही जनहित याचिका दाखल केली आहे. धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी देश-विदेशातील लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे येतात. दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनुयायांमुळे इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या अनुयायांवर कोणाचेही नियंत्रण नसते, असे विविध आक्षेप या याचिकेद्वारे घेण्यात आले आहेत. यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संताप पसरला आहे. याविरोधात न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करीत संबंधित सर्व आक्षेप चुकीचे असल्याचे सांगत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भगवाननगर येथील अनिकेत कुत्तरमारे व इतर १९ नागरिक आणि नारा येथील समता आरोग्य प्रतिष्ठान यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. ससाई यांचे वकील ॲड. शैलेश नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना काळे यांना ही याचिका दाखल करण्याचा कायदेशीर अधिकारच नाही, याकडे लक्ष वेधले. याचिकेतील आरोप निराधार आहेत. त्यामुळे लाखो अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. परिणामी, सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने या प्रकरणात गेल्या १३ ऑक्टोबर रोजी रेल्वे मंत्रालयासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून १८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते; परंतु या प्रकरणावर १८ ऑक्टोबर रोजी काही कारणांमुळे सुनावणी होऊ शकली नाही.
असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे
काळे यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रेल्वे विभागाकडे तक्रार करून आरक्षित डब्यांमधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांना नियंत्रित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने त्यांना १५ डिसेंबर २०२२ रोजी पत्र पाठवून नागपूर ते मुंबई व मुंबई ते नागपूर रेल्वेमधील आरक्षित डब्यांमध्ये आवश्यक सुरक्षारक्षक तैनात करण्याचे मुंबई, भुसावळ व नागपूर विभागाच्या वरिष्ठ सुरक्षा आयुक्तांना आदेश दिल्याचे कळविले. यावर्षी २४ ऑक्टोबर २०२३ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे. दरम्यान, रेल्वेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे काळे यांचे म्हणणे आहे.
द्वेषभावनेतून केलेली याचिका
दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांविरोधात दाखल केलेली याचिका ही पूर्णपणे द्वेषभावनेतून करण्यात आली आहे. जातीय द्वेषभावना अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने ती रद्द करावी, अशी मागणी नागपुरातील आंबेडकरी युवा कार्यकर्त्यांच्या वतीने पत्रपरिषदेत करण्यात आली.
दीक्षाभूमीवर मागील ६६ वर्षांपासून धम्मदीक्षेचा सोहळा सुरळीत पार पडतोय. कुठलाही अनुचित प्रकार कधी घडलेला नाही. कुणालाही काही त्रास झाल्याचीही तक्रार नाही. या काळात रेल्वेच्या उत्पन्नातही १० पटीने वाढ होत असल्याचे रेल्वेने अनेकदा जाहीर केले आहे. त्यामुळे ही याचिका केवळ द्वेषभावनेतून केल्याचे दिसून येते. दीक्षाभूमीवरचा सोहळा हा केवळ धार्मिक सोहळा नव्हे तर तो वैचारिक सोहळाही आहे. अनेक जातीधर्मांचे लोक तिथे येतात. कधी कुणाला त्रास झाला नाही. पत्रपरिषदेत वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे, आशिष फुलझेले, पायल गायकवाड, सिद्धार्थ पाटील, हिमांशू वाघमारे, यश कुंभारे यांचा समावेश होता.