मेपर्यंत आरोग्य विद्यापीठाचे कामकाज ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:32 AM2019-02-05T00:32:48+5:302019-02-05T00:33:49+5:30
जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता मे २०१९ पर्यंत शोधनिबंध, गुणपत्रिका, पदवी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता मे २०१९ पर्यंत शोधनिबंध, गुणपत्रिका, पदवी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
सोमवारी विद्यापीठाच्या नागपूर मेडिकल येथील विभागीय केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील ऑनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे भारतातील हे एकमेव विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इतरही बाबी ‘ऑनस्क्रीन’ करण्याच्या प्रयत्नात आहे.
मेडिकलमध्ये जागा मिळण्यासाठी प्रयत्न
विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राची व्याप्ती वाढविण्यासाठी पूर्वी पाच एकर जागेचा शोध सुरू करण्यात आला होता. मिहान येथील जागा उपलब्ध होणार होती. परंतु येथून केंद्राचा कारभार चालविणे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे होणार असल्याने तूर्तास नकार दिला आहे. मेडिकलमध्येच या केंद्रासाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा नुकताच एक प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठविण्यात आला आहे. सध्या आहे त्या जागेवरील केंद्रात आवश्यक मनुष्यबळ व फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत पीजी विद्यार्थ्यांना गाईड
मेडिकलमधील औषधवैद्यकशास्त्र विभागात (मेडिसीन) प्राध्यापकाची रिक्त असलेली जागा, एका सहयोगी प्राध्यापकाची बदली तर एका सहयोगी प्राध्यापकाच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाचे १४ विद्यार्थी मार्गदर्शका(गाईड)अभावी अडचणीत आले आहेत. यावर उपाय म्हणून मेडिकल प्रशासनाने सहयोगी प्राध्यापकांना शैक्षणिक पदोन्नती (अकॅडमिक प्रमोशन) देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे पाठविला आहे. याबाबत बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, यासंदर्भातील एक पत्र विद्यापीठालाही प्राप्त झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड मिळेल अशी सोय केली जाईल, अशी ग्वाही डॉ. म्हैसेकर यांनी दिली.