मरावे परी अवयवरूपी उरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:14+5:302021-08-15T04:11:14+5:30

-अवयवदान सप्ताह सुमेध वाघमारे नागपूर : जातस्य ही ध्रुवो मृत्यू !’ जो जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...

Urave as a fairy organ to die | मरावे परी अवयवरूपी उरावे

मरावे परी अवयवरूपी उरावे

Next

-अवयवदान सप्ताह

सुमेध वाघमारे

नागपूर : जातस्य ही ध्रुवो मृत्यू !’ जो जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. केवळ आप्तेष्टांच्या आठवणीत जिवंत राहते. परंतु अवयवदानाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे अस्तित्व प्रत्यक्षात जिवंत राहून अनेक व्यक्तींना नवआयुष्य देऊ शकते. सध्याच्या स्थितीत भारतात मूत्रपिंडासाठी सुमारे अडीच लाख, हृदय व यकृतासाठी प्रत्येकी ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करून याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

कुणाचा अपघात होतो, कुणावर संकट येते, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य थांबते. कुण्या दात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते. परंतु भारतात अवयव दान करण्याबाबत फारशी जागृती नाही. उलट ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्याविषयी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात अवयवदानाचा टक्का मात्र प्रति दहा लाख लोकांमागे केवळ ‘.३४’ टक्के आहे. अलिकडच्या काळात हा टक्का वाढला असला तरी तो फार कमी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

::अवयवदानाची पद्धत?

अवयवदानाच्या दोन पद्धती आहेत. एक रुग्णाच्या मृत्यूनंतर आणि दुसरे म्हणजे जिवंतपणी. व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांमध्ये अवयव काढून ते गरजवंतांमध्ये प्रत्यारोपित केले जातात तर दुसऱ्या पद्धतीमध्ये गरजवंताच्या नातेवाईकांमधून कोणीतरी स्वयंस्फूर्तीने अवयवदान करतात.

::एक ‘ब्रेन डेड’ व्यक्ती किती लोकांना जीवनदान देऊ शकते

जर एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे अवयव वेगवेगळ्या लोकांना दान केले तर कमीतकमी १० लोकांना जीवनदान मिळू शकते. पेशींच्या (सेल्स) - दानातून ५० लोकांचे आयुष्य अधिक चांगले होऊ शकते.

::प्रत्यारोपणासाठी उपयोगी अवयव?

महत्वपूर्ण अवयवांमध्ये हृदय, यकृत, पेन्क्रियास, आतड्या, दोन मूत्रपिंड, दोन फुफ्फुस आदींचा प्रत्यारोपणासाठी उपयोग होतो. पेशींमध्ये, अंध व्यक्तींसाठी कॉर्निआ (बुबुळ), जळलेल्या रुग्णांसाठी त्वचा, इतर रुग्णांसाठी कानाचे पडदे आणि रक्तवाहिन्यांचा उपयोग होतो.

::अवयवदानात काय महत्त्वपूर्ण?

चार डॉक्टरांचे एक पॅनल सहा तासांच्या अंतराने दोन वेळा 'ब्रेन डेड' असल्याचे निदान करतात. निरोगी अवयवाचे तातडीने प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न असतो. कायद्यानुसार त्यांच्या वारसांकडून सहमती आवश्यक असते. अवयवदानासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही किंवा दिले जात नाही.

:: काय करायला हवे

-रुग्णालयाने ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत रुग्णाचे निदान करून तातडीने त्याची माहिती ‘झेडटीसीसी’ला देणे

-‘ब्रेन डेड’ व्यक्तींच्या कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानासाठी त्यांना प्रोत्साहित करणे

-अवयव प्रत्यारोपण डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक (कौन्सिलर) यांची साखळी तयार करणे.

- जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे.

:: जिवंत व्यक्तीचे अवयवदान

जिवंत व्यक्ती फक्त जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते. रुग्णदात्याचा जवळचा नातेवाईक म्हणजे मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊबहिण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. याव्यतिरिक्त कोणालाही अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्तीच्या जीवनपद्धतीत व प्रकृतीवर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊनच जिवंत व्यक्ती अवयवदान करू शकते. यामुळे जिवंत व्यक्ती काही मर्यादित अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड अथवा यकृताच्या काही भागांचे दान करू शकते.

:: ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदान

जिची हृदयक्रिया बंद पडली आहे, फक्त नेत्र व त्वचा या अवयवांचे दान करू शकते. मृत व्यक्तीत हृदयक्रिया बंद पडल्याने इतर अवयवांना रक्तपुरवठा थांबलेला असतो. हे अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरतात. मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालू आहे, म्हणजे जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू ‘ब्रेन डेड’ झाला आहे, अशी व्यक्ती मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप व कानांचे ड्रम यांचे दान करू शकते.

:: किती तासात प्रत्यारोपण शक्य

- डोळे काही महिने जतन केले जाऊ शकतात.

- हाडे आणि त्वचा कितीही काळापर्यंत जतन केली जाऊ शकते.

- फुफ्फुस ६ तास जतन केले जाऊ शकते.

- किडनी ४८ तास जतन केली जाऊ शकते.

::अवयवदानात कोणता देश कुठे

(प्रति दहा लाख लोकसंख्या मागे अवयवदान करणाºयांची संख्या)

भारत ०० .३४ टक्के

अर्जेंटिना १२ टक्के

जर्मनी १६ टक्के

इटली २० टक्के

आॅस्ट्रेलिया २३ टक्के

अमेरिका २४ टक्के

फ्रान्स २५ टक्के

क्रोएशिया ३३.५ टक्के

स्पेन ३४ टक्के

:: भारतात अवयवदानाची किती गरज

::मूत्रपिंड गरज२,५०,०००

मिळतात ८,०००

::हृदय गरज५०,०००

मिळतात १५-२०

:: यकृत गरज५०,०००

मिळतात ८००

:: नागपूर विभागातील अवयवदानाची स्थिती

वर्षे :ब्रेन डेड: मूत्रपिंड: यकृत :हृदय :फुफ्फुसे :नेत्र :त्वचा

२०१३ :०१ :०२ :०० :०० :०० :०० :००

२०१४ :०३ :०५ :०० :०० :०० :०० :००

२०१५ :०४ :०७ :०० :०० :०० :०० :००

२०१६ :०६ :१२ :०१ :०० :०० :०४ :०१

२०१७ :१४ :२४ :१२ :५ :०० :१२ :०५

२०१८ :१८ :३३ :१८ :४ :१ :१२ :०२

२०१९ :१८ :२८ :१६ :३ :२ :०६ :००

२०२० :०३ :०६ :०२ :०० :०० :०३ :००

२०२१ :०६ :१० :०६ :०१ अ०० :०२ :००

एकूण ७३ १२७ :१२५ :१३ :०३ :३९ :०८

Web Title: Urave as a fairy organ to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.