शहरी नक्षलवादीच मुख्य सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:46 AM2018-09-21T00:46:43+5:302018-09-21T00:48:00+5:30
शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले. भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले.
भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले. अन्य वक्त्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे व संघटनेचे अध्यक्ष अरविंद सोहनी यांचा समावेश होता.
नक्षल चळवळ शहरी नक्षलवाद्यांद्वारे संचालित केली जाते. ते या चळवळीसाठी पैसा, रसद व शस्त्रे पुरवितात. त्यांनी निरागस आदिवासींची डोकी भडकवून सशस्त्र सेना उभी केली आहे. त्या सेनेमार्फत दबाव टाकून व अमानुष अत्याचार करून चळवळीमध्ये नवीन भरती केली जाते. आदिवासी मुळात नक्षलवादी नाहीत. परंतु, छळापासून वाचण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे ते नक्षल चळवळीत सामील होतात. खरे नक्षलवादी अशा भोळ्याभाबड्या आदिवासींना मरण्यासाठी पुढे करतात व स्वत: पळून जातात. अशा
आदिवासींविरुद्ध खटले दाखल झाल्यानंतर त्यांना कुणी वाचवायलाही येत नाही. खरे नक्षलवादी कायद्याच्या सापळ्यात अडकल्यानंतर मात्र त्यांची सुटका करण्यासाठी महागड्या वकिलांची फौज उभी केली जाते. परिणामी आधी शहरी नक्षलवाद्यांना संपवले पाहिजे. त्यानंतर जंगलातील नक्षलवादी आपोआप संपतील, असे मिश्रा यांनी पुढे बोलताना सांगितले.
अलीकडे कारवाई करण्यात आलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा कोरेगाव भीमातील घटनेशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. त्यांना या घटनेसाठी जबाबदार धरले जात असल्यामुळे प्रकरण कमकुवत झाले आहे. त्यांच्याविरुद्ध पंतप्रधानांना ठार मारण्याचा कट रचण्यासारखे महत्त्वाचे पुरावे आहेत. केवळ याच आधारावर त्यांना शिक्षा केली जाऊ शकते, याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.
शहरी व ग्रामीण नक्षलवाद असा भेद करणे चुकीचे आहे. हा भेद करणे हेच राजकारण आहे, असे मत देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले तर, नक्षली चळवळ देशाच्या व समाजाच्या विकासाकरिता घातक ठरत आहे, असे अरविंद सोहनी यांनी सांगितले. संघटनेचे सचिव श्रीकांत भोवते यांनी प्रास्ताविक केले.