नागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 01:35 AM2020-09-29T01:35:10+5:302020-09-29T01:36:34+5:30
खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.
नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांना निवेदन दिले होते व खतांची काळाबाजारी होत असल्याचा आरोपही केला होता. शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटानी दरवर्षी ग्रस्त असतो. यंदा दोन्ही संकटे मानगुटीवर असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने संपूर्ण शेती पाण्यात गेली असता कपाशीसाठी गरजेचे असलेली खतेही उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर विक्रेते खतच उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर ही बाब मान्य नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर कृषी सभापती वैद्य यांनी खताच्या तुटवड्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खापर फोडले. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार मेट्रिक टन अधिकचे खत प्राप्त झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, वर्धा तालुक्यातील सेलू, अमरावतीचा काही भाग येथील शेतकरी नागपूर जिल्ह्यातून खते खरेदी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात खतांची उपलब्धता
युरियाबद्दल बोलताना त्यांनी सांगतले की, गेल्यावर्षी ४५ हजार मेट्रिक टन युरिया मंजूर होता. यंदा ५१ हजार १६० मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. त्यानंतरही आतापर्यंत ५६ हजार १८९ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. त्यात ४५ हजार ४२१ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून अद्याप १० हजार ७६८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी २१ हजार २९० मेट्रिक टन मंजूर होते. त्यात २४ हजार ३६८ मेट्रिक टन उपलब्ध झाले. तर २२ हजार ६३२ मेट्रिक टन विक्री झाली असून १,७३६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.