पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्याची धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:08 AM2021-01-17T04:08:00+5:302021-01-17T04:08:00+5:30
नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता सरकारने ५ ते ८ वर्गाच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू ...
नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता सरकारने ५ ते ८ वर्गाच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर ग्रामीण ९ ते १२ वर्ग सुरू होऊन महिना लोटला असतानाही केवळ ३४ टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. काही तुरळक कारणे असली तरी ९ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. आता सरकार ५ ते ८ वर्ग नियमित सुरू करणार आहे. या वर्गातील मुलांचा वयोगट कमी असल्याने काही प्रमाणात पालकांमध्ये धास्ती आहे. पण ग्रामीण भागातील काही पालकांनी ९ ते १२ चे वर्ग सुरळीत झाल्याचे बघून शाळेत पाठविण्याला दुजोरा दिला आहे.
राज्य शासनाने ५ ते ८ वर्ग सुरू करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशामुळे पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाचेही पुन्हा टेन्शन वाढले आहे. तशा ९ ते १२ च्या ग्रामीण भागात ६४६ शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांमध्ये ५ ते ८ वर्ग आहे. फक्त जिल्हा परिषदेच्या ५६८ शाळांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोरोनाच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नव्हत्या.
- जिल्ह्यातील एकूण शाळा - १२१४
- शिक्षकांची संख्या - १७३२
- विद्यार्थ्यांची संख्या - ११२०० (वर्गनिहाय आकडेवारी गोळा करणे सुरू आहे)
- ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची ३४ टक्के उपस्थिती
नागपूर ग्रामीणमध्ये ९ ते १२ च्या ६४६ शाळा आहेत. यात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३१ हजारावर आहे. ग्रामीणमध्ये शाळा सुरू होऊन महिना लोटला आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या शाळा भेटी अहवालानुसार ४५ हजारावर विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत.
- पालकांना काय वाटते
- कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. शाळा सुरू व्हाव्यात अशी पालकांना अपेक्षा आहेच, विद्यार्थीही आता घरी बसून कंटाळले आहे. मुले लहान असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये याची भीती आहे.
नरेश कहिले, पालक
- तसे तर वर्ष संपलेलेच आहे. दोन महिन्यांसाठी शाळा सुरू करून काही विपरीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार आहे. मला वाटते की यावर्षी विद्यार्थ्यांना प्रमोट केल्यास काहीच हरकत नाही. उगाच थोड्या दिवसांसाठी प्रशासनानेही रिस्क घेऊ नये.
सुरेश काळबांडे, पालक
- जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक उपाययोजना करू
आमची पूर्ण तयारी आहे. ९ ते १२ च्या शाळा सुरू करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्या सर्व उपाययोजना करू. आता कुठे शासनाने आदेश काढला आहे. त्यावर जिल्हाधिकारी काय आदेश देतात, त्यावर निर्भर आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शाळा सुरू करण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहे, त्या निश्चितच पूर्ण करू, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.