उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 09:55 PM2022-06-08T21:55:32+5:302022-06-08T22:21:18+5:30
Nagpur News नागपुरातील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी उर्वी शाहा हिने ९७.८३ टक्के (५८७ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी उर्वी शाहा हिने ९७.८३ टक्के (५८७ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ती वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यात विभागाने झेप घेतली आहे. राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.
शिवाजी विज्ञान विद्यालयाचा विद्यार्थी मितेश वांढरे ९७.५० (५७९ गुण) टक्के प्राप्त करत विज्ञान शाखेतून पहिला आला, तर कला शाखेतून ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी तुलसी चौधरी हिने ९४.८३ टक्के (५६९ गुण) मिळवत पहिले स्थान पटकाविले.
विभागात एकूण १ लाख ५९ हजार १०६ पैकी १ लाख ५३ हजार ५८४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले. नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार ७७९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ८१२ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.४७ टक्के इतकी आहे, तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले.
विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ३९६ म्हणजेच ९७.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ६१ हजार २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९६.६५ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वांत कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १७ हजार १० पैकी १६ हजार २२३ म्हणजे ९५.३७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा : निकाल टक्केवारी
भंडारा : ९७.३० टक्के
चंद्रपूर : ९६.१० टक्के
नागपूर : ९६.६५ टक्के
वर्धा : ९५.३७ टक्के
गडचिरोली : ९६.०० टक्के
गोंदिया : ९७.३७ टक्के