हा तर आमच्यासाठी ‘प्रेरणाकलश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:08 PM2018-08-23T20:08:52+5:302018-08-23T20:22:00+5:30

माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या तीन कलशांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना उपराजधानीतील कार्यकर्ते गहिवरले होते. हा आमच्यासाठी प्रेरणाकलशच असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. विदर्भातील विविध ठिकाणी अस्थिकलश यात्रा निघणार आहे.

This is for us 'inspirational kalash' | हा तर आमच्यासाठी ‘प्रेरणाकलश’

हा तर आमच्यासाठी ‘प्रेरणाकलश’

Next
ठळक मुद्देअटलजींचे अस्थिकलश नागपुरात दाखल : भाजपा कार्यकर्ते गहिवरले

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या तीन कलशांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना उपराजधानीतील कार्यकर्ते गहिवरले होते. हा आमच्यासाठी प्रेरणाकलशच असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. विदर्भातील विविध ठिकाणी अस्थिकलश यात्रा निघणार आहे.
सकाळी १० च्या सुमारास मुंबईहून नागपूर विमानतळावर तीन अस्थिकलश आणण्यात आले. नागपूर भाजपाचे सरचिटणीस किशोर पलांदूरकर आणि संजय टेकाडे हे अस्थिकलश घेऊन पोहोचले. त्यांनी हे अस्थिकलश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.रामदास तडस, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना सुपूर्द केले. यावेळी आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.मिलिंद माने, आ.गिरीश व्यास, नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, महापौर नंदा जिचकार, मनपाचे स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. हे कलश नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी रवाना करण्यात आले. पहिला अस्थिकलश आ.आंबटकर यांच्या नेतृत्वात सेलू, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तर दुसरा अस्थिकलश डॉ.राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात बुटीबोरी, हिंगणा, वाडी, काटोल, सावनेर येथे पाठविण्यात आला. तिसरा अस्थिकलश बुलडाणा, वाशीमच्या मार्गे रवाना करण्यात आला. विमानतळापासूनच रथांवर हे अस्थिकलश रवाना झाले. २६ आॅगस्ट रोजी सकाळी कामठी येथील महादेव घाटावर सकाळी ९ वाजता या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिली.

कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
यावेळी भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यात माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, सुभाष पारधी, संदीप जाधव, भोजराज डुम्बे, श्रीकांत देशपांडे, संजय फांजे, धर्मपाल मेश्राम, अरविंद गजभिये,अविनाश खडतकर, डॉ कीर्तिदा अजमेरा यांचा प्रामुख्याने समावेश होता.

नागपुरात शुक्रवारी येणार अस्थिकलश
२४ आॅगस्ट रोजी पारशिवनी, मौदा व उमरेड या भागातील यात्रा करून रात्री ९ वाजतापर्यंत अस्थिकलश नागपूरला परत आणला जाईल. २५ रोजी सकाळी ९ ते ३ वाजतापर्यंत दर्शनासाठी भाजपाच्या गणेशपेठ येथील मंगलम् कार्यालयात ठेवण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

अटलजींच्या कुटुंबीयांचा भाजपाला पडला विसर
दरम्यान विमानतळावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांची कुठेही उपस्थिती नव्हती. विशेष म्हणजे अटलजींची सख्खी भाची अनिता पांडे या देवनगरात राहतात. अटलजी अत्यवस्थ असताना त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीला बोलविण्यात आले होते. अनिता पांडे यांचे पती भय्या पांडे १२ आॅगस्टपासून दिल्लीत होते. त्यांचे भाऊ मुरैनाचे खासदार अनुप मिश्रा हरिद्वार येथे झालेल्या अस्थी विसर्जनाला उपस्थित होते. मात्र नागपुरात अटलजींच्या अस्थींचा कलश येत असल्याची माहिती पांडे कुटुंबीयांना देण्यात आली नाही. भाजपाच्या कुठल्याही नेत्याने याची माहिती दिली नाही. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आम्हाला हे कळाले, असे भय्या पांडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: This is for us 'inspirational kalash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.