यू. म. पठाण व मनाेहर म्हैसाळकर यांना ‘राम शेवाळकर’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 09:53 PM2021-10-28T21:53:47+5:302021-10-28T21:54:18+5:30
Nagpur News अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे प्राचार्य ‘राम शेवाळकर’ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. यू. म. पठाण आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनाेहर म्हैसाळकर यांना जाहीर झाला आहे.
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे प्राचार्य ‘राम शेवाळकर’ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. यू. म. पठाण आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनाेहर म्हैसाळकर यांना जाहीर झाला आहे. महामंडळाने नियुक्त केलेल्या निवड समितीने केलेली निवड महामंडळाने जाहीर केली. प्रत्येकी एक लाख रुपये राेख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
काेराेनामुळे राहून गेलेला २०२०-२१ चा पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक किंवा संशाेधकाला द्यायचा हाेता. त्यानुसार निवड समितीने डाॅ. पठाण यांची निवड केली. डाॅ. पठाण हे मराठी संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व संशाेधक म्हणून सर्वदूर ओळखले जातात. त्यांची ४० च्या आसपास ग्रंथसंपदा असून, त्यापैकी संत साहित्यावरील २० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. पुणे येथे झालेल्या ६३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष हाेते. विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त असून, राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्कारानेही त्यांना गाैरविण्यात आले आहे.
त्यांच्यासह प्राचार्य शेवाळकरांच्या नावाने दिला जाणारा २०२१-२२ चा साहित्य संस्थात्मक वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार मनाेहर म्हैसाळकर यांना प्रदान केला जाईल. म्हैसाळकर हे १९८२ मध्ये सरचिटणीस म्हणून विदर्भ साहित्य संघात आले. तेव्हापासून वि. सा. संघाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. मागील १० वर्षांपासून ते वि. सा. संघाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे वि. सा. संघाचा ४० वर्षांचा इतिहास मनाेहर म्हैसाळकरांच्या नावाशी जाेडला गेला आहे. काही काळ अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. या वाङ्मयीन सेवेसाठी पाचव्या प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य काैतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.