कोड घालविण्यासाठी केसांच्या मेलानोसाईटचा वापर : सुशील सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:09 AM2018-11-24T00:09:24+5:302018-11-24T01:22:41+5:30
दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुशील सावंत यांनी येथे दिली. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुशील सावंत यांनी येथे दिली.
महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, पांढरे कोड निर्माण होण्याची कारणे निश्चित सांगता येत नाहीत. जनुकदोष, प्रतिबंधक उपाय यंत्रणेमध्ये दोष, न्यूरोजनिक दोष ही महत्त्वाची कारणे असू शकतात. मानसिक तणाव यामुळेसुद्धा ‘मेलॅनिन’ची निर्मिती थांबते आणि पांढरे डाग दिसू लागतात. कोडवर उपचार आहेत. सुरुवातीला दोन वर्षे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात औषधोपचार घेऊन डाग येणे आणि पसरणे थांबविले जाते. त्यानंतर ज्या शरीराच्या भागावर पांढरा डाग आहे त्यावर संबंधित शस्त्रक्रिया करून डाग घालविले जातात. यात साधारण मांडीचे, हाताच्या दंडाचे, कंबरेवरचे साधारण ‘०.१’ ते ‘२.५’ एमएम त्वचा काढून लावली जाते. अलीकडे केसाच्या मुळांमधून ‘मेलानोसाईट’ काढून त्याचे ‘सस्पेशन’ तयार करून जिथे कोड आहे तिथे पेशी ‘ट्रान्सफर’ करणाऱ्या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले आहे. या सर्व शस्त्रक्रियेचा यशाचा दर १०० टक्के आहे. परंतु शस्त्रक्रियेपूर्वी ‘पोस्ट थेरपी’ करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
‘पेम्फिगस’ ससंर्गजन्य नाही
नायर हॉस्पिटलच्या त्वचारोग विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा नायक म्हणाल्या, त्वचा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. बाह्य वातावरण विरुद्ध अडथळा निर्माण करते आणि शरीराची संरक्षणाची पहिली ओळ म्हणून कार्य करते. यामुळे त्वचेच्या आजाराबाबत गंभीर असणे आवश्यक आहे. विशेषत: त्वचेवर येणारे पाण्याने भरलेले लाल रंगाचे फोड म्हणजे ‘पेम्फिगस’ हा संसर्गजन्य आजार नाही. परंतु रुग्णांच्या शरीरावरील हे फोड पाहून अनेक जण रुग्णापासून दूर जातात. हा रोग तोंडापासून ते गुप्तांगासारखी त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यावर होतो. हा रोग वेदनादायी आहे. पूर्वी या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. परंतु आता औषधोपचार उपलब्ध आहे. या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्मल पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते.
परिषदेला ९००वर त्वचारोग तज्ज्ञांचा सहभाग
या परिषदेला देशभरातून ९००वर त्वचारोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी डॉ. स्वप्निल शाह, डॉ. शैलेंद्र निसळ, डॉ. सतीश सावंत, डॉ. प्रियाल गाला, डॉ. सुजय खांदपूर, डॉ. ए. रज्जाक अहमद, डॉ. उदय कोपकर आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेच्या आयोजनासाठी ‘क्युटीकॉन’ परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. विक्रांत सावजी, आयोजक सचिव डॉ. रिझवान हक, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी आदी परिश्रम घेत आहेत.