तणनाशकांचा वापर वाढला!
By admin | Published: July 26, 2014 08:56 PM2014-07-26T20:56:19+5:302014-07-26T20:56:19+5:30
पाच वर्षांमध्ये सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा भरमसाट वापर वाढला
अकोला : अलिकडच्या पाच वर्षांमध्ये सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा भरमसाट वापर वाढला असून, या तणनाशकांचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने केला जात नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी तर पीक उगवलेच नसल्याचे प्रकार घडले असल्याने तणनाशकांचा वापर करताना शेतकर्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र २0 लाख हेक्टरने वाढले आहे. या पिकाच्या मशागतीचा खर्च कमी आणि उत्पादन बर्यापैकी होत असल्याने शेतकर्यांचा कल सोयाबीनकडे जास्त आहे. या पिकातील तणाचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर अलिकडच्या पाच वर्षांमध्ये वाढला आहे; परंतु तणनाशकांचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. यापृष्ठभूमिवर तणनाशकाच्या वापराबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीनुसार ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तसेच धुके किंवा पाऊस सुरू असेल तर तणनाशकांची फवारणी करणे योग्य नाही; तथापि नेमके याच काळात तणनाशकांचा वापर होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी पेरणीच्या किंवा दुसर्या दिवशी बियाणे मातीने व्यवस्थित झाकण्याची गरज आहे. यासाठी उगवण तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसणे पाहणे आवश्यक आहे. तणनाशक फवारताना ते अधूनमधून ढवळावे लागते. फवारणीसाठी फ्लॅट फैन किं वा फ्लड जेट नोझल वापरावे लागते. ठरावीक क्षेत्रात किती द्रावण फवारले, हे तपासणे गरजेचे आहे. २,४ - डी या तणनाशकांची मूग, उडीद या सारखे द्विदलवर्गीय पीक असल्यास फवारणी करू नये. तणनाशके पॉवर स्प्रेने फवारणी टाळावी, स्वच्छ पाणी वापरावे, इतर पिकांवर तणनाशकांचा फवारा पडणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कीटकनाशके, बुरशीनाशक ांशी संपर्क येणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. पूर्वानुभव नसल्यास त्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. २,४ डी- तणनाशकांचा कपाशी पिकावर दुष्परिणाम झाल्यास तो परिणाम कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. नवीन फूट येण्यासाठी त्यामध्ये एक किलो युरिया १00 लीटर पाण्यात फवारणी करणे आवश्यक आहे.