वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:20 AM2018-10-26T11:20:14+5:302018-10-26T11:20:45+5:30
आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात तीन महिन्यात तांत्रिक चाचणी पूर्ण करून आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिलेत.
यासंदर्भात पद्मकुमार जैन यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्यात ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी आॅथोरिटी (टेक्निकल स्टॅन्डर्डस् फॉर कन्स्ट्रक्शन आॅफ इलेक्ट्रिकल प्लॅन्स अॅन्ड इलेक्ट्रिक लाईन्स) रेग्युलेशन्स-२०१०’मधील तरतुदींचे काटेकोर पालन होत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. पारेषण, वितरण व वीज उपकेंद्रात अधिनियमाने ठरवून दिलेल्या दर्जाचे ट्रान्सफार्मर्स व अन्य उपकरणे वापरली जात नाहीत. त्यामुळे आग लागणे व ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतात. त्यात अनेकदा प्राणहानी व वित्तहानी होते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपकरणे खरेदी करतानाच त्यांचा दर्जा तपासला जाणे आवश्यक आहे. तसेच, उपकरणे नियमानुसार बसवली गेली पाहिजे आणि उपकरणाची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग केली गेली पाहिजे. परंतु, या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे दूर्घटना घडतात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, चौकशीनंतर दोषपूर्ण वीज उपकरणे पुरविणाऱ्या विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.