प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी ‘डमी’ चेहऱ्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:02 PM2019-06-19T22:02:25+5:302019-06-19T22:03:47+5:30
शहरातील गँगस्टर डमी चेहऱ्यांना समोर करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या रस्त्यातून हटवित आहेत. अलीकडे झालेल्या हत्येच्या घटना याचे संकेत देतात. यात पलास दिवटे, कार्तिक तेवर आणि विजय मोहोड हत्याकांडाचा प्रामुख्याने समावेश आहे. तिन्ही गुन्ह्यातील आरोपींनी खरे कारण लपवून पोलिसांची दिशाभूल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील गँगस्टर डमी चेहऱ्यांना समोर करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या रस्त्यातून हटवित आहेत. अलीकडे झालेल्या हत्येच्या घटना याचे संकेत देतात. यात पलास दिवटे, कार्तिक तेवर आणि विजय मोहोड हत्याकांडाचा प्रामुख्याने समावेश आहे. तिन्ही गुन्ह्यातील आरोपींनी खरे कारण लपवून पोलिसांची दिशाभूल केली आहे.
गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हेगार पलास दिवटेची हत्या हुडकेश्वर येथील वेडा हरी गावात करण्यात आली होती. पलासलाही विजय मोहोडच्या हत्येतील मूख्य सूत्रधार अभय राऊतने मारले होते. पलास एकेकाळी अभयला मानत असते. त्याला ‘भाऊ’ म्हणायचा. परंतु मागील काही वर्षात गुन्हेगारी विश्वात त्याचेही नाव झाले. त्याने अभयला भाऊ म्हणणे बंद केले. अभय हा बिट्स गँगशी जुळलेला होता. पलासचे उमरेड रोडवर जुगार आणि सट्ट्याचे अड्डे आहे. पलास त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला होता. त्यामुळे अभयने संकेत मिळताच पलासची साथीदाराच्या मदतीने हत्या केली. हुडकेश्वर पोलिसांनी अभयसह चार आरोपींना अटक केली होती. अभयने स्वत:च ठाण्यात जाऊन समर्पण केले होते. अभयने ठरलेल्या योजनेंतर्गत एकट्यानेच पलासची हत्या केल्याचे सांगितले होते. परंतु तपासाच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारालाही अटक केली होती.
अभयने दुसऱ्याच्या इशाऱ्यावर पलासची हत्या केली होती. यामुळे काही दिवसातच त्याची व त्याच्या साथीदारांची जामीनावर सुटका झाली. आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्यात दक्षिण नागपुरातील ‘कैथवास’ ने मोठी भूमिका बजावली होती. थोड्या दिवसातच जामीन मिळाल्याने अभयला यंत्रणेचे हात कमजोर असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे त्याने विजयची हत्या करण्यासाठीही मागे पुढे पाहिले नाही. त्याचप्रकारे १९ मे रोजी कुही येथील डोंगरगाव स्थित फार्म हाऊसवर गुन्हेगार कार्तिक तेवरची हत्या करून त्याचा मित्र साहीलला जखमी करण्यात आले होते. मनीषनर येथील रहिवासी संदीप कौशीक आमि शुभम वानखेडेने १९ मे रोजी डोंगरगाव येथे आपल्या जन्मदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यात दोन्ही मित्रांना निमंत्रित केले होते. संदीपने बोलवल्याने कार्तिक, सूरज आणि साहिल नावाच्या मित्रांसोबत गेला होता. यादरम्यान आरोपी आशिष मनोहरेच्या मित्रांचा काही युवकांशी वाद झाला होता. कार्तिकने फटकारल्यामुळे आशिषने त्याच्याशी वाद घातला होता.
याचा बदला घेण्यासाठी पार्टीवरून परत येताना आशिष मनोहरने संतोष निनावे आणि इतर लोकांच्या मदतीने कार्तिक तेवरची हत्या केली.
कार्तिक गँगस्टर दिवाकर कोत्तुलवार गँगशी जुळला होता. तो दिवाकरसोबत एमआयडीसीच्या मोंटी भुल्लर हत्याकांडातही सहभागी होता. मोंटीच्या हत्येनंतरच तो गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला होता. कमी वेळातच त्याने आपला धाक निर्माण केला होता. त्याची हत्या करणारे अतिशय कमजोर खेळाडू होते. पार्टीत जाण्यापूर्वी कार्तिक खामल्याच्या गोलूसोबत होता. गोलूने त्याला नशेसाठी एमडी दिली होती. पार्टीत कार्तिकसोबत बाल्या गावंडे हत्याकांडाचा आरोपी जय होता. त्याने कार्तिकला पार्टीत खूप दारू पाजली होती. बाल्याच्या हत्येनंतर जय चर्चेत होता. त्याचप्रकारे गोलू सुद्धा क्रिकेट सट्टा आणि एमडीचा मोठा व्यापारी असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर गोलू व जयची भूमिकाही संशयास्पद दिसून येते. विजयच्या हत्येचा तपासही गांभीर्याने न केल्यास त्याचाही परिणाम दिवटे आणि कार्तिक तेवर हत्याकांडाप्रमाणे होईल.
सर्रासपणे सुरू आहेत जुगार अड्डे
उमरेड रोडवर जुगार अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. आठ महिन्यांपूर्वी पलास दिवटेच्या हत्येच्या प्रकरणातच येथील जुगार अड्ड्याची भूमिका समोर आली होती. परंतु कारवाई झाली नाही. हे अड्डे हुडकेश्वर आणि कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ आहेत. यामुळे दोन्ही ठाण्यातील पोलीस एकमेकांकडे बोट दाखवित असतात. मिळालेल्या माहितीनुसार जुगार अड्ड्यातील कमाईचा मोठा हिस्सा या पोलिसांकडेही जातो. खरा प्रकार समोर यावा म्हणूनच पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवली आहे.
गुन्हेगार करताहेत दिशाभूल
विजय मोहोडची हत्याही सुनियोजित पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळेच अभय राऊत आणि सूरज कार्लेवार पोलिसांना कुठलीही माहिती सांगत नाही आहेत. ते त्यांच्याशिवाय केवळ निखिल तिडकेचेच नाव घेत आहेत. अभय क्रूर प्रवत्तीचा गुन्हेगार आहे. त्याला माहिती आहे की, त्याच्यावर ज्याचा हात आहे, त्या सूत्रधाराचे नाव सांगितले तर सुटण्याचा मार्ग बंद होईल. तसेच जीवालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे तो पोलिसांची दिशाभूल करीत आहे.
तिसऱ्या साथीदारालाही अटक
दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी विजयच्या हत्येत सहभागी असलेल अभय राऊत आणि सुरज कार्लेवार त्यांचा साथीदार निखील तिडके यालाही बुधवारी अटक केली. हत्येनंतर निखील फरार झाला होता. निखील सुद्धा या हत्येत आणखी कुणी सहभागी असल्याचे नाकारत आहे. परंतु सूत्रानुसार विजयच्या हत्येत अनेक गुन्हेगार सामील आहेत. काहींनी पडद्याच्या मागून काम केले तर काही थेट जुळले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.