संत्रा पिकासाठी गांडुळ खताचा वापर : ७०० संत्रा झाडांपासून चार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 09:46 PM2017-12-12T21:46:35+5:302017-12-12T21:49:58+5:30
निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आहे.
विजय नागपुरे
आॅनलाईन लोकमत
नागपूर : निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आहे.
बीएस्सी (अॅग्रीकल्चर) पदविकेपर्यंत शिक्षण झालेले अरुण घोंगे यांच्याकडे २० एकर शेती असून त्यापैकी १२ एकरात १० वर्षांची ७०० संत्रा झाडे, १५० मोसंबी व १५० लिंबूची झाडे आहेत. यात फक्त शासकीय योजनेतून ३०० झाडांची लागवड केली असून ती झाडे सध्या चार वर्षांची आहे. तर संपूर्ण बागायत शेती ठिबक सिंचनावर ओलित होत असून त्यासाठी शेतीत दोन विहिरी खणण्यात आल्या आहे. तर शेतीसाठी लागणाऱ्या शेणखतासाठी १० गाई पाळल्या असून त्यांच्यापासून मिळणारे शेणखत व काही बाहेरून असे २० ट्रकच्या जवळपास दरवर्षी संत्राझाडांना शेणखत देण्यात येते.
तसेच मागील सात वर्षांपासून गांडुळ खत प्रकल्प शासकीय सहकार्यातून सुरू केला असून त्या व्यतिरिक्त स्वखर्चातून अधिकचे युनिट तयार केले. जमीन हलक्या स्वरूपाची असल्याने कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागत असल्याचे अरुण घोंगे यांनी सांगितले.
संत्रा झाडांना बुरशी लागू नये म्हणून वेळोवेळी ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करणे सुरू असते. सध्या दरवर्षी दोन लाखांच्या जवळपास खर्च होत असून चार लाख रुपयांचे उत्पन्न होत असते. परंतु निसर्गाच्या अवकृपेने कधी कधी संपूर्ण संत्रा उत्पादनच हातून जात असल्याने केलेला खर्चही वसूल होत नाही, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.
संत्र्याला हमीभाव मिळावा
शेतमालासह संत्र्याला हमीभाव जाहीर करावा तसेच बाहेर राज्यात संत्रा विकण्यासाठी संत्रा वाहतुकीत विम्यासहीत शासनाकडून सबसिडी मिळावी. जेणेकरून अधिक उत्पादन घेणारे शेतकरी बाहेर राज्यात संत्रा विकून जास्तीचा भाव मिळवू शकतील.
अरुण घोंगे
शेतकरी, बोरगाव (धुरखेडा).