एटीएममधून रक्कम लंपास, बनावट चावीचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:07 PM2017-08-08T23:07:01+5:302017-08-08T23:07:29+5:30
नंदनवनमधील एटीएममधून चोरट्यांनी ३ लाख ७१ हजारांची रोकड लंपास केल्याचे उघड झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २३ जून ते १२ जुलै दरम्यान झालेल्या या चोरीप्रकरणात बँकेच्या अधिका-यांनी सोमवारी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
नागपूर, दि.8 - नंदनवनमधील एटीएममधून चोरट्यांनी ३ लाख ७१ हजारांची रोकड लंपास केल्याचे उघड झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २३ जून ते १२ जुलै दरम्यान झालेल्या या चोरीप्रकरणात बँकेच्या अधिका-यांनी सोमवारी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
नंदनवनमधील बहादुरा (उमरेड रोड) मार्गावर एका व्यापारी संकुलात इक्वीटास मॉल फायनान्स बँकेचे एटीएम आहे. या एटीएमचे लॉक बनावट चावीने उघडून २३ जूनच्या मध्यरात्रीपासून तो १२ जुलैपर्यंत ३ लाख, ७१ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. आरोपींनी ही रक्कम चोरण्यासाठी ४१ वेळा मशिनचे लॉक उघडले. बँकेचे उपमहाव्यवस्थापक सुनील राम पत्की (वय ३७, रा. मेहर निवास, समर्थ नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
बँकांच्या एटीएममधून रोकड चोरण्याचा तीन दिवसातील हा दुसरा गुन्हा आहे. मंगलमूर्ती चौक, प्रतापनगर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पाच आरोपींनी सव्वा सात लाख रुपयांची रोकड लंपास केली. ९ जून ते ३ आॅगस्ट या कालावधीत चार वेळा आरोपींनी ही हातचलाखी केली. हा गुन्हा तीन दिवसांपूर्वी प्रतापनगर ठाण्यात दाखल झाला तर, आता नंदनवनमधील एटीएममधून रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला.