कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर

By Admin | Published: May 24, 2017 02:26 AM2017-05-24T02:26:11+5:302017-05-24T02:26:11+5:30

दामदुप्पट दराने झटपट कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या काही खासगी वित्तीय संस्थांनी कर्जवसुली करण्यासाठी उपराजधानीतील कुख्यात गुंडांच्या टोळ्यांना हाताशी धरले आहे.

Use of goats for loan repayments | कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर

कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर

googlenewsNext

वित्तीय संस्थांकडून वसुलीच्या नावाखाली लुटमार : कर्जदारांमध्ये दहशत
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दामदुप्पट दराने झटपट कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या काही खासगी वित्तीय संस्थांनी कर्जवसुली करण्यासाठी उपराजधानीतील कुख्यात गुंडांच्या टोळ्यांना हाताशी धरले आहे. हे सशस्त्र गुंड कर्जदारांवर हल्ले चढवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून कर्जवसुलीच्या नावाखाली चक्क लुटमार करीत आहेत. यशोधरानगर आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीतील या धक्कादायक वसुलीभार्इंचे कृत्य उघड झाले आहे. त्यामुळे खासगी कर्ज घेणारे छोटे छोटे उद्योजक, वाहनचालक अन् व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मोठ्या वित्तीय संस्थांपेक्षा जास्त वेगाने खासगी वित्तीय संस्थांचे जाळे उपराजधानीत पसरत आहे. बेरोजगारांना हाताशी धरून या खासगी संस्था छोट्या छोट्या व्यावसायिकांना मोठे उद्योजक, व्यापारी होण्याचे स्वप्न दाखवत असून झटपट कर्जही उपलब्ध करून देत आहे. सर्वाधिक कर्ज प्रकरणे वाहनांच्या खरेदी संदर्भातील आहेत. २ लाखांपासून ते २० लाखांपर्यंतच्या कर्जाची रक्कम उपलब्ध करून द्यायची, या बदल्यात विकत घेतलेले वाहन आणि कर्जधारकाची स्थावर मालमत्ता तारण ठेवायची, कर्जधारकाला विशिष्ट रकमेचे हप्ते ठरवून द्यायचे. एक हप्ता थकीत झाल्यास त्यावर मनमानी पद्धतीने व्याज लावायचे. जबरदस्तीने कर्जाची रक्कम वसूल करायची अन् तीन चार हप्ते थकले की ते वाहन आणि कर्जदाराची मालमत्ता ‘सिझिंग’च्या नावाखाली बळकवायची, अशी या वित्तीय संस्थांची कर्जवसुलीची पद्धत आहे. विशेष म्हणजे, कर्ज वसूल करण्यासाठी अनेक वित्तीय संस्थांनी विशिष्ट टक्केवारीवर वसुलीभार्इंची अर्थात गुंडांच्या टोळ्यांची अनधिकृत नेमणूक केली आहे. या टोळ्यांमध्ये शहरातील कुख्यात गुंड, हिस्ट्रीशिटर भरलेले आहेत. चाकू, तलवारी, बेसबॉलचे दंडे, हॉकी, लोखंडी रॉडच नव्हे तर कधी कधी पिस्तूल घेऊन टोळ्यातील गुंड कर्जदारांच्या घरावर, कार्यालयावर धडकतात. कर्जदाराकडून रोख रक्कम मिळाली तर ठीक अन्यथा त्यांच्या घरातील, कार्यालयातील मौल्यवान चीजवस्तू, सोन्याचे दागिने आणि ज्या वस्तू-वाहनावर कर्ज घेतले ती वस्तू किंवा वाहन हिसकावून नेतात. अनेकादा अनधिकृतपणे संबंधित कर्जदाराच्या घरावर,सदनिकेवरही कब्जा करतात आणि संबंधित कर्जदारांकडून कर्जाची रक्कम वसूल करवून घेतात. उपराजधानीत हा धक्कादायक गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. त्यामुळे कर्जदारांमध्ये प्रचंड दहशत आहे. गुंडांचा धाक आणि जीवाच्या भीतीमुळे तक्रारकर्ते पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतात.
त्याचा पुरेपूर गैरफायदा काही वित्तीय कंपन्या आणि त्यांचे वसुलीभाई घेत आहेत. गेल्या सात दिवसात अशाप्रकारे वसुली करण्याच्या दोन घटना घडल्यामुळे या गोरखधंद्याचे बिंग फुटले आहे.

 

Web Title: Use of goats for loan repayments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.