होलिकादहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा : महावितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:22 PM2019-03-16T22:22:56+5:302019-03-16T22:24:36+5:30
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या ह्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.
होळीच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फटका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, बेधुंद वाहन चालकांमुळेही अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नियोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, उत्सवप्रिय जनतेच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना टाळून त्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणेही आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या.
घरात होळी खेळताना वीज मिटर, विजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने विजेच्या बटनांना स्पर्श करू नका. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता २४ तास सुरू असणारे नि:शुल्क क्रमांक १९६१२, १८००२३३३४३५ किंवा १८००१०२३४३५ यावर संपर्क साधावा, असेही महावितरणने म्हटले आहे.
अशी घ्या काळजी
- वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा.
- होळी आणतांना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.
- वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.
- ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.
- वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.