कायद्याचा वापर न्याय देण्यासाठी करावा
By admin | Published: April 13, 2016 03:14 AM2016-04-13T03:14:05+5:302016-04-13T03:14:05+5:30
अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजाविताना आणि कायद्याची अंमलबजावणी करताना व्यक्तीस योग्य न्याय मिळेल,
एस. राजेंद्रबाबू : ‘एनएडीटी’मध्ये प्रशिक्षणार्थींना पदव्युतर पदविका प्रदान
नागपूर : अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजाविताना आणि कायद्याची अंमलबजावणी करताना व्यक्तीस योग्य न्याय मिळेल, या दिशेने कार्यरत राहावे, असे आवाहन भारताचे पूर्व सरन्यायाधीश डॉ. एस. राजेंद्रबाबू यांनी नागपूर येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे प्रशिक्षणावधी पूर्ण करणाऱ्या भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ६८ व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांना बंगलोर येथील नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटी (एनएलएसआययू) यांच्यातर्फे ‘बिझनेस लॉ’ या विषयामध्ये पदव्युतर पदविका प्रदान करण्याच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात ‘एनएलएसआययू’चे कुलगुरू व्यंकटराव आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे माहितीचा भडिमार होत असताना, माहितीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असा हितोपदेश याप्रसंगी डॉ. एस. राजेंद्रबाबू यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला.व्यंकटराव म्हणाले, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी व एनएलएसआययू या संस्थेचे परस्पर व लाभदायक संघटन निश्चित फलदायी ठरणार आहे.
या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून भविष्यातील आयकर अधिकारी विद्यापीठास भूषणावह ठरतील.
गुंजन मिश्रा म्हणाल्या, ही पदविका अधिकाऱ्यांना भविष्यातील कारकीर्दीत कायद्यासंबंधी कार्यवाही करताना खूप उपयुक्त ठरणार आहे.(प्रतिनिधी)