मोबाईल कमी वापरा, निरंतर वाचन करा : अमितकुमार चव्हाण यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:44 PM2020-01-04T22:44:55+5:302020-01-04T22:47:36+5:30

जीवनात ध्येय गाठायचे असल्यास मोबाईल वापर कमी करा, आवडत्या विषयांचे निरंतर वाचन करा आणि सामान्य ज्ञान वाढवा, असा मोलाचा सल्ला शासकीय कामगार अधिकारी अमितकुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना येथे दिला.

Use less mobile, read more constantly: Amit Kumar Chavan's valuable advice to students | मोबाईल कमी वापरा, निरंतर वाचन करा : अमितकुमार चव्हाण यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

मोबाईल कमी वापरा, निरंतर वाचन करा : अमितकुमार चव्हाण यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

Next
ठळक मुद्देलोकमत समूहाच्या ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आई-वडिलांना मुलांची ‘स्ट्रेंग्थ व वीकनेस’ आठवीनंतर लक्षात येते. त्यानुसार मुलांना घडविण्याचे कर्तव्य आई-वडिलांचे आहे. हे करीत असतानाच मुलांना त्यांचे आयुष्य मनमुराद ‘एन्जॉय’ करू द्या. मुलांनो जीवनात काय व्हायचे आणि कोणते शिक्षण घ्यायचे हे तुम्हीच ठरवा. त्यामुळे आयुष्याचा प्रवास अधिक सुलभ आणि यशस्वी होणार आहे. जीवनात ध्येय गाठायचे असल्यास मोबाईल वापर कमी करा, आवडत्या विषयांचे निरंतर वाचन करा आणि सामान्य ज्ञान वाढवा, असा मोलाचा सल्ला शासकीय कामगार अधिकारी अमितकुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना येथे दिला.
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे शनिवारी लोकमत समूहातील सदस्यांच्या प्रज्ञावंत पाल्यांचा ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्य अतिथी म्हणून चव्हाण यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर लोकमत समाचारचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान आणि लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, सर्वच मुले सारखी नसतात. सर्वांना क्षमता सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला पाहिजे. आई-वडिलांनी मुलांवर अनावश्यक गोष्टी थोपवू नये. त्यांचा आयक्यू वाढवावा. उच्चस्तरीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जे काही करायचे ते लक्ष देऊन करा. उदाहरण देताना ते म्हणाले, टीव्हीवर सिनेमा वा सिरियल पाहायची असल्यास मन लावून पाहावी. हीच गोष्ट अभ्यासालाही लागू होते. शिक्षण सोबत घेऊन चला. आई-वडील जे करतात, ते तुमच्या भल्यासाठीच असते. म्हणून आई-वडिलांचे म्हणणे नेहमी ऐका. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यात त्यांचे यशस्वी जीवनाचे सार दडले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो जीवनात नेहमी प्रामाणिक राहा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
मुलांवर सतत अभ्यासाचे, परीक्षेचे दडपण देऊ नका. स्वत:च्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाच्या इच्छा मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्या कुवतीनुसार, कौशल्यानुसार करिअर निवडू द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
चव्हाण म्हणाले, कोणते शिक्षण घ्यायचे, याचा विचार मी आठवीत केला होता. आई आणि वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. कष्ट करण्याची जास्त सवय नव्हती, पण जे वाचायचो ते लक्षात राहायचे. पुढे कृषी विषयात पदवी संपादन केली. स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यानुसार पदवीनंतरचे शिक्षण न घेता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. एमपीएससीच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी वर्ग-२ चा अधिकारी म्हणून दहा वर्षांपूर्वी शासनाच्या कामगार विभागात रुजू झालो. पण त्यापूर्वी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. पहिल्याच टप्प्यात प्रीलिमिनरी व मुख्य परीक्षा पास केली. काही कारणांनी मुलाखतीत यशस्वी झालो नाही. एक संधी असून पुन्हा यूपीएससी परीक्षा देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. इतरांना पाहूनच डॉक्टर किंवा इंजिनियरिंगमध्ये करिअर निवडला जातो, म्हणून या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. पण बीए झालेला माझा मित्र आयएएस झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मतीन खान यांनी तर संचालन वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह (कार्मिक) सुनील कोंगे यांनी केले. यावेळी लोकमतच्या कार्मिक विभागाचे सहायक व्यवस्थापक अरविंद बावनकर, वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह मनीष वेखंडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

३९ विद्यार्थ्यांना लोकप्रज्ञा पुरस्कार व प्रमाणपत्र
यावेळी लोकमत समूहात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ३९ प्रज्ञावंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना लोकप्रज्ञा पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये पहिल्या वर्गातील प्रियांशू बिसेन, वैदेही धरमकर, हंसिका नांदूरकर, दुसऱ्या वर्गातील नैतिक बैस, अभिजात त्रिफळे, हार्दिक तायडे, लोकेश पाल, युगांक बावणे, वैभव खडगी, तिसऱ्या वर्गातील रितेश गाकरे, पूर्वा शर्मा, ४ थ्या वर्गातील शंतनु धोटे, महेक खान, महविश खान, शौर्य बादलकर, ५ व्या वर्गातील सायली नांदे, रिदा सेठ, राजवी कुकडे, अनुष्का दडवे, स्निग्धा गजभिये, ६ व्या वर्गातील हिमांशु बिसेन, अलोक लोनबेले, ७ व्या वर्गातील सिद्धी ढोके, यश आकरे, संबोधी गजभिये, ८ व्या वर्गातील आराध्य इंगोले, तनुश्री खंडाळ, प्रतीक्षा बनसोड, १० वीचे शिवा राजू, पार्थ गाडगीलवार, स्वाती मिश्रा, ११ वीतील तेजस तीर्थगिरीकर, १२ वीतील जान्हवी दीक्षित, बीई प्रथम वर्ष वेदांती अस्वार, श्रेया चक्रवर्ती, अश्विन आन्दे, पॉलिटेक्निक तिसरे वर्ष अनुष्का जोशी, बीई चौथे वर्ष तनुज गाडगीलवार, निधी तीर्थगिरीकर.

Web Title: Use less mobile, read more constantly: Amit Kumar Chavan's valuable advice to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.