कोळसा खाणीमध्ये होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:14 AM2018-03-05T11:14:22+5:302018-03-05T11:14:30+5:30
इंडियन ब्युरो आॅफ मॉईन्सचा (आयबीएम) ७१ वा स्थापना दिवस हा ‘खनिज दिवस’ म्हणून १ मार्चला नागपुरातील मुख्यालयात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन ब्युरो आॅफ मॉईन्सचा (आयबीएम) ७१ वा स्थापना दिवस हा ‘खनिज दिवस’ म्हणून १ मार्चला नागपुरातील मुख्यालयात साजरा करण्यात आला.
मुख्य अतिथी म्हणून वेस्टर्न कोल फील्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र, विशेष अतिथी म्हणून मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.पी. चौधरी आणि अध्यक्षस्थानी आयबीएमचे महानियंत्रक रंजन सहाय होते. देशात खाणींचे वातावरण तयार करण्यासाठी सेवा अर्पण करणाऱ्यांचे खनिज दिवसानिमित्त स्मरण करण्यात आले. यानिमित्ताने रक्तदान शिबिर आणि ‘खनिज मार्च’चे आयोजन करण्यात आले. यात आयबीएमसह सहयोगी संस्थांच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला.
राजीव रंजन मिश्र यांनी आयबीएमची कार्यरत भूमिका आणि भारतीय खाण व खनिज क्षेत्रांच्या विकासाच्या दिशेने आयबीएमच्या योगदानाची माहिती दिली. वाळू उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी वेकोलिने पुढाकार घेतला आहे. तसेच कोळसा खाणीतील पाणी ‘कोल नीर’ या नावाने कमी दरात पिण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे. फ्लाय अॅशपासून विटा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रंजन सहाय यांनी आयबीएमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सकारात्मकरीत्या पार पाडाव्यात, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वरिष्ठ मार्गदर्शक, आयबीएमचे माजी अधिकारी, एम. मुखर्जी आणि आयबीएमचे माजी महानियंत्रक सी.एस. गुंडेवार यांचे आभार मानले. आयबीएमच्या खाणींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक एस. टियू यांनी स्वागतपर भाषण तर खनिज अर्थशास्त्रज्ञ एम.यू. सिद्दीकी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आयबीएमचे मुख्य खनिज अर्थशास्त्रज्ञ डॉ. पी.के. जैन यांनी आभार मानले.