अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्समध्ये ‘नीरी’च्या ‘अॅप’चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:25 PM2020-11-17T22:25:49+5:302020-11-17T22:27:39+5:30
Nagpur News App ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणे शक्य झाले आहे. आता ‘नीरी’ने या ‘अॅप’चे सुधारित ‘व्हर्जन’ आणले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये या ‘अॅप’चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी २०१९ मध्ये ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले होते. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणे शक्य झाले आहे. आता ‘नीरी’ने या ‘अॅप’चे सुधारित ‘व्हर्जन’ आणले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये या ‘अॅप’चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युके, स्पेन इत्यादी देशांचा समावेश आहे हे विशेष.
‘अॅप’च्या नवीन ‘व्हर्जन’मध्ये ‘स्क्रीन’ला नवीन ‘स्मार्ट लूक’ देण्यात आला आहे. मोबाईलच्या ‘मॉडेल’ नुसार आवाज मोजण्यातील अचूकता बदलू शकते. त्यामुळे मायक्रोफोन संवेदनशीलता मोजता यावी यासाठी ‘अॅप’ला ‘कॅलिब्रेट’ करण्यासाठी ‘कॅलिब्रेशन फिचर’सोबत जोडण्यात आले आहे. आता आंतरराष्ट्रीय मापदंडासोबतदेखील आवाजाच्या पातळीची तुलना केली जाऊ शकते.
फटाके फोडण्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढते. आवाजामुळे शारीरिक व मनोवैज्ञानिक प्रभाव निर्माण होतो. यामुळे झोपेत अडथळा, हृदयासंबंधी समस्या, कार्यक्षमतेत कमतरता आणि ऐकण्यात दुर्बलता यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. ध्वनिप्रदूषण (विनियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी ५५ डेसिबल्स (सकाळी ६ ते रात्री १०) व ४५ डेसिबल्स (रात्री १० ते सकाळी ६) इतकी असणे अपेक्षित आहे.
कुठेही आवाजाची पातळी मोजा
विविध देशांतील वापरकर्त्यांनी त्यांचे अनुभव, सल्ले व शिफारशीदेखील ‘शेअर’ केल्या आहेत. त्यामुळे या ‘अॅप’मध्ये सुधारणा करण्यात मोठे सहकार्य झाले. ‘नॉईज ट्रॅकर’ या ‘अॅप’ला ‘डाऊनलोड’ केल्यानंतर मोबाईलच्या ‘जीपीएस’ला सुरू करुन आवाजाची पातळी मोजता येऊ शकते. नागरिकांनी याचा उपयोग केला तर त्यांना सहजपणे ध्वनिप्रदूषणाची कल्पना येईल, असे ‘नीरी’चे ध्वनिप्रदूषण तज्ज्ञ सतीश लोखंडे यांनी सांगितले.
कसे कार्य करते ‘अॅप’ ?
‘जीपीएस’च्या माध्यमातून ‘अॅप’ संबंधितांचे नेमके स्थळ शोधतो. तर मोबाईलमधील मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाजाची पातळी मोजल्या जाते. मोबाईलच्या ‘स्क्रीन’वर ही माहिती झळकते. वापर करणारी व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आवाजाची पातळी मोजू शकते आणि संपूर्ण ‘डाटा’ एखाद्या तक्त्याच्या स्वरुपात पाहू शकते,