पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; छत्तीसगड सीमेलगत ड्रोनच्या वारंवार घिरट्या
By नरेश डोंगरे | Published: October 8, 2023 06:09 AM2023-10-08T06:09:36+5:302023-10-08T06:10:34+5:30
पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षल्यांनी चक्क ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
नागपूर : रात्रंदिवस घनदाट जंगलात राहून चळवळ फळफळू शकत नाही. दुसरे म्हणजे, पोलिसांची गोळी कुठून येईल आणि कसा वेध घेईल, याचा नेम उरला नसल्याचे ध्यानात आल्यामुळे की काय, नक्षलवाद्यांनी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलिसांच्या हालचालींचा वेध घेणे सुरू केले आहे. पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षल्यांनी चक्क ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे चार जिल्हे नक्षलग्रस्त म्हणून देशात ओळखले जायचे. गेल्या काही वर्षांत नक्षल्यांनी भंडारा आणि चंद्रपूरवरून नजर हटवत गोंदिया, गडचिरोलीवरच फोकस केला. अलीकडच्या काही वर्षांपर्यंत नक्षल चळवळीची प्रचंड दहशत या दोन जिल्ह्यात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि प्रभावी कारवाई करून नक्षल्यांचे कंबरडेच मोडून काढले आहे. मिलिंद तेलतुंबडेच्या एन्काउंटरनंतर गोंदिया - गडचिरोलीची नक्षल चळवळ पुरती खिळखिळी करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकीकडे नक्षलवादी पकडले जात आहे. काही मारले जात आहे तर काही नक्षलवादी सरेंडर करीत आहेत.
दुसरे म्हणजे, गोंदिया, गडचिरोलीत विकासकामांचाही झपाटा वाढला आहे. त्यामुळे आधीसारखे बेरोजगार तरुण-तरुणी नक्षल चळवळीत सहभागी होत नाहीत. शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगाराला विकासाची साथ मिळाल्याने आणि प्रशासनाकडून मदतीचा हात मिळत असल्याने नक्षल चळवळीपासून गोंदिया-गडचिरोलीतील गरीब, आदिवासी तरुण दहा हात दूरच राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे नक्षल्यांचे मनुष्यबळ कमालीचे मर्यादित झाले असून नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागल्याची चर्चा ऐकू येते आहे. परिणामी नक्षल्यांनी चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी गोंदिया-गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
हालचाली टिपण्यासाठी, पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी ते चक्क ड्रोनचा वापर करीत आहेत. छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमेवरील दुर्गम भागात अशा प्रकारे ड्रोन वारंवार घिरट्या घालताना पोलिसांना दिसत आहे. शहानिशा केल्यानंतर हे ड्रोन नक्षल्यांकडूनच ऑपरेट केल्याची पोलिसांना आता खात्री पटली आहे.
धामरेचा, पेचलीमेटीकडे घिरट्या
गेल्या काही दिवसांत पोलिसांना गोंदिया-गडचिरोलीच्या दुर्गम भागातील धामरेचा, पेचलीमेटी, मन्ने राजाराम आदी भागांत ड्रोन संशयास्पद घिरट्या घालताना दिसले आहेत.
पोलिसांची रेकी करण्यासाठी अनेक दिवसांपासून नक्षलवादी ड्रोनचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आमच्या उपाययोजना करीत आहोत.
- संदीप पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्र.