वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर
By सुमेध वाघमार | Published: May 8, 2023 03:21 PM2023-05-08T15:21:55+5:302023-05-08T15:23:04+5:30
नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे.
नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाहन चालकांच्या समुपदेशनासह टायरची तपासणी के ली जात आहे. आता वाहनाला ‘रिफ्लेक्टर’ असेल तरच या महामार्गावर प्रवेश दिला जाईल, असा निर्णय आरटीओ ग्रामीणने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे.
नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. सध्या दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री समृद्धी महामार्गावर वर्दळ वाढली आहे. रात्री अपघाताचा धोका लक्षात घेऊन वाहनाना ‘रिफ्लेक्टर’ची सक्ती करण्यात आली आहे. रिफ्लेक्टर नसल्यास हजार रुपये दंड व ते लावतपर्यंत वाहनांना अटकावून ठेवण्याची मोहिम हाती घेतली आहे.
रात्री वाहन दिसावे म्हणून रिफ्लेक्टर आवश्यक
वाहनांच्या दोन्ही बाजूंना मान्यताप्राप्त वितरकाकडून प्रमाणित परावर्तक (रिफ्लेक्टर) लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्री रस्त्यावर धावणाºया वाहनांना दुसरे वाहन दिसून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होते.
२० वाहनांवर कारवाई
ग्रामीण आरटीओने मागील दोन दिवसांत रिफ्लेक्टर नसलेल्या २० वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, रिफ्लेक्टर लावल्यावरच त्यांना सोडण्यात आले आहे.