नागपुरात बँकांमध्ये सॅनिटायझरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:20 AM2020-03-13T11:20:52+5:302020-03-13T11:21:20+5:30
कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये बायोमेट्रिक मशीनजवळील सॅनिटायझरचा उपयोग कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
बँक ऑफ इंडियाच्या नागपूर झोनचे झोनल व्यवस्थापक विलास पराते म्हणाले, नागपूर विभागांतर्गत १०७ शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखांच्या व्यवस्थापकांना बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर आणि स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
त्यानुसार सर्वच व्यवस्थापकांनी व्यवस्था केली आहे, तसेच खासगी एजन्सीतर्फे संचालित सर्वच एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक मनोज करे म्हणाले, बँकेच्या प्रत्येक शाखेत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बायोमेट्रिक व्यवस्था आहे. कर्मचाºयाने मस्टरवर सही केल्यानंतर त्याला आपला कॉम्प्युटर बायोमेट्रिकने सुरू करायचा आहे.
‘एटीएम’मध्ये सॅनिटायझर नाही
राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी एटीएमचे संचालन व सुरक्षा खासगी एजन्सीकडे दिली आहे. त्यांना संबंधित बँकांनी कोरोना विषाणूच्या धोका ओळखून एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवून एटीएम परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पण संचालन करणाऱ्या कंपनीतर्फे अधिकाऱ्यांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. कोणत्याही एटीएममध्ये स्वच्छता वा ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण देशात सतर्कता बाळण्यात येत असताना एजन्सीने ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्राहकांची मागणी आहे.