सावरकरांच्या नावाचा वापर हे निव्वळ भाजपाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:21 PM2019-12-16T13:21:28+5:302019-12-16T13:25:07+5:30
'देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे'
नागपूर : देश पेटलेला असताना आणि देशासमोर महिला अत्याचारासह अर्थव्यवस्था डबघाईस आल्यासारखे अनेक ज्वलंत प्रश्न असताना केवळ सावरकरांचा मुद्दा पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा प्रकार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सावरकरांच्या नावाचा वापर हे भाजपाचे राजकारण आहे. देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही परिस्थिती सांभाळली नाही तर देश विकोपाला जाऊ शकतो. देशात सुरू असलेल्या महिला अत्याच्यावर भाजपा बोलत नाही.सध्या देशामध्ये पेटलेल्या वणव्याबद्दल सुद्धा बोलण्याची भाजपाला फुरसत नसल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
याचबरोबर, सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सर्वांच्या मोबाईलमध्ये आणि खाजगी आयुष्यात डोकावणार आहेत. त्यामुळे सर्वांचे खाजगी आयुष्य संपणार आहे. याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये यासाठी सावरकरांचा मुद्दा पुढे करून सर्वांचे लक्ष हे सरकार विचलित करत आहे, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले.