भूमिगत कोळसा उत्खननासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
By admin | Published: April 19, 2015 02:25 AM2015-04-19T02:25:38+5:302015-04-19T02:25:38+5:30
भूमिगत कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी कोळसा
नागपूर : भूमिगत कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांना दिली. तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या स्वरूप यानी श्निवारी वेकोलिच्या अदासा भूमिगत कोळसा खाणीचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान अधिकारी त्यांना माहिती देत होते.
अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने अदासा खाण ही सर्वश्रष्ठ भूमिगत खाणींपैकी एक आहे. कोल इंडियामधील आपल्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक २.३ टन प्रति मॅनशिफ्टआऊटपुट देणारी ही कोळसा खाण आहे. खाणीमध्ये ये-जा करणे सोपे व्हावे यादृष्टीने येथील व्यवस्थापनाने नवीन मॅन राईडिंग सिस्टीम लावले आहे. याची पाहणी सुद्धा स्वरूप यांनी केली. वेकोलीने भूमिगत खाणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर सर्वाधिक जोर दिला असल्याची माहिती सुद्धा त्यांना देण्यात आली.
तांडसी खाणीत कंटीन्युअस मायनर टेक्नॉलॉजीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भूमिगत खाणीमध्ये पायी प्रवासादरम्यान आणि श्रमिकांचा थकवा कमी करण्यासाठी वेकोलितर्फे ८ खाणीमध्ये ९ मॅन रायडिंग सिस्टीम लावण्याचा प्रयोग केला जात आहे. वित्तवर्ष २०१५-१६ मध्ये वणी नॉर्थ क्षेत्रातील राजूर खाण, पेंच क्षेत्रातील नहेर या खाणीमध्ये सुद्धा ही प्रणाली लावण्याचा विचार सुरू आहे. सुरक्षाव्यवस्था वाढविण्याच्या दृष्टीने ६ खाणींमध्ये टेलिमॉनिटरिंग सिस्टीम लावण्यात आले आहे.
इतर नऊ खाणींमध्ये सुद्धा ही सिस्टीम लावण्याचे प्रस्तावित आहे. वेकोलिचे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक तांत्रिक एस.एस. माल्ही यांनी स्वरूप यांना सविस्तर माहिती दिली.
नागपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक ए.के. मजुमदार हे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)