सर्किट ब्रेकरचे सुरक्षा कवच वापरा, विद्युत अपघाताचे धोके टाळा
By आनंद डेकाटे | Published: July 4, 2024 04:46 PM2024-07-04T16:46:53+5:302024-07-04T16:49:37+5:30
Nagpur : महावितरणचे नागरिकांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यात घर, दुकान, सोसायट्या, इलेक्ट्रिक वाहन व इतर उपकरणांमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यांतून विद्युत प्रवाहाचा धक्का बसून अपघात होत असतात. यासाठी प्रामुख्याने ग्राहकांकडील अंतर्गत वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर, अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तूंमध्ये सर्किट ब्रेकर लावण्यात यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्किट ब्रेकर हे एक विद्युत सुरक्षा उपकरण आहे जो इलेक्ट्रिकल सर्किटला ओव्हरकरंट,ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. संरक्षणात्मक रिलेने दोष शोधल्यानंतर विद्युत प्रवाहात व्यत्यय आणणे हे त्याचे मूळ कार्य आहे. वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य अर्थिंग अत्यावश्यक आहे. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरू राहिल्यास अपघात होतात. असे झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तुंमध्ये सर्किट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (इएलसीबी), रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी), मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर (एमसीबी) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणांमधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे.
विद्युत अपघात टाळण्यासाठी अर्थिग योग्य स्थितीत असल्याची किमान दर दोन वर्षांनी खात्री करून घ्यावी. नवीन वास्तू बांधताना प्रामुख्याने अर्थिगसह सर्किट ब्रेकर लावणे अनिवार्य आहे. मात्र, जुन्या वास्तूमध्ये ते नसल्यास तत्काळ लावावे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले. दिवसेंदिवस वीजेची वाढती मागणी आणि बीज यंत्रणेचा होणारा विस्तार बघता सर्किट ब्रेकरचे महत्व देखील वाढले आहे.
अशी घ्या काळजी
बाजारात सुमारे २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या विद्युत टेस्टरमुळे वीज अपघाताचे धोके टाळता येतात. ओल आलेल्या भिंतीला, टिनपत्र्याला, कपडे वाळत घालायच्या लोखंडी तारेला, फ्रीज, टिव्ही, संगणक, गिझर किंवा पाण्याचे नळ, कुलर आर्दीना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील, तसेच ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी विद्युत टेस्टरने त्याची तपासणी करावी. पायात रबरी किंवा प्लॅस्टिक चप्पल वापरावी, असेही महावितरणने कळविले आहे.