नामांकित कंपनीचे नाव वापरले, ट्रेडिंग करणाऱ्याला ५९ लाखांनी गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:16 AM2024-09-06T11:16:09+5:302024-09-06T11:16:37+5:30
व्हर्चुअल दीड कोटीचा दाखविला नफा : प्रत्यक्षात हाती आला भोपळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका नोकरदार व्यक्तीला शेअर ट्रेडिंगचे ज्ञान असूनदेखील सायबर गुन्हेगारांनी त्याला जाळ्यात ओढले व नामांकित कंपनीचे नाव वापरत तब्बल ५९ लाखांनी गंडा घातला. सायबर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून यातील किती पैसे परत मिळतील हा मोठा प्रश्न आहे.
सोमलवाडा येथील गांगुली ले आउटमधील संबंधित तक्रारदार नोकरदार असून ते अनेक वर्षांपासून नियमितपणे ट्रेडिंग करतात. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ते ट्रेडिंग करतात. ३ जुलै रोजी त्यांना एसएमएस आला व त्यात एसएमसीकडून ऑफर असल्याचे नमूद होते. गुंतवणूक केल्यास २५ टक्के नफा होईल असे त्यात लिहिले होते. त्यातील लिंकला क्लिक केल्यावर तक्रारदार 'एसएमसी स्टॉक बूस्ट ग्रुप' या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन झाले. त्यात ट्रेडिंगसाठी टीप्स दिल्या जात होत्या. त्या हिशेबाने तक्रारदारानेदेखील ट्रेडिंग केले.
५ जुलै रोजी रितू वोहरा नावाच्या अॅडमिनने त्यांना संपर्क साधला व एसएमसी कॅपिटल नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगितले. त्यात तक्रारदाराने पूर्ण तपशील दिला. त्यानंतर शेअर्स विकत घेण्यासाठी त्यांनी २७ ऑगस्टपर्यंत ५९ लाख ३१ हजार रुपये भरले. त्यांना दीड कोटीचा नफा संबंधित अॅपमध्ये दाखविण्यात येत होता. ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता अॅडमिनने नफा खूप जास्त असल्याने ३० लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने त्यानंतर एसएमएसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संबंधित अॅप त्यांचे नसल्याची बाब स्पष्ट झाली. तुमच्यासोबत फसवणूक झाल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींनी संबंधित कंपनीचा बनावट लोगो तयार करून अॅप तयार केले होते. अखेर संबंधित नोकरदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.