उषा माधव देशमुख यांना वि.सा. संघाचा जीवनव्रती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 08:49 PM2021-12-08T20:49:58+5:302021-12-08T20:51:01+5:30
विदर्भ साहित्य संघाचा २०२१ सालाचा स्व. ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उषा माधव देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे.
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा २०२१ सालाचा स्व. ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उषा माधव देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी ही घोषणा केली.
मराठी संत साहित्याचे अभ्यासक व चिकित्सक विवेचक स्व. माधव गोपाळ उपाख्य मा. गो. देशमुख यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी आपल्या उच्चशिक्षणाला सुरुवात केली. नागपूर विद्यापीठातून बी.ए., मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. आणि नागपूर विद्यापीठातूनच डॉक्टरेट अशा पदव्या मिळवून त्यांनी १९७२ पासून मुंबई विद्यापीठात अधिव्याख्याता व पुढे विभागप्रमुख म्हणून कार्य केले. १९९६ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. मराठीचे साहित्यशास्त्र : रामदास ते रामजोशी, साहित्यरंग, दीपमाळ, मराठी साहित्याचे आदिबंध, काव्यदिंडी, साहित्य शोधणी, कुसुमाग्रज साहित्यदर्शन, साहित्यमुद्रा, ज्ञानेश्वर एक शोध, रामायणाचा आधुनिक साहित्यावर प्रभाव, दलित साहित्य स्थितीगती, ज्ञानेश्वरी जागरण आदी त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. १४ जानेवारी २०२२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९९ व्या वर्धापनदिन समारंभात त्यांना स्व. ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार प्रदान करण्यात येईल.