उष:काल होता होता काळरात्र झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:45+5:302021-07-30T04:07:45+5:30

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे ...

Usha: Yesterday it was dark night ... | उष:काल होता होता काळरात्र झाली...

उष:काल होता होता काळरात्र झाली...

googlenewsNext

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये

मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे पुराने उद्ध्वस्त केली आहेत. हे भीषण चित्र डोळ्यासमोरून जात असताना ३० वर्षांपूर्वीच्या मोवाडच्या (जि.नागपूर) भयकारी आठवणी ताज्या केल्या. २९ जुलै १९९१ ला मध्यरात्रीच्या कोसळधार पावसामुळे वर्धा नदीचा बांध पहाटे (दि.३०) फुटला आणि सकाळ होता होताच मोवाड एखादे मिसाईल टाकल्याप्रमाणे बेचिराख झाले ! हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महापुराच्या आठवणी आजही अंगावर काटा उभा करतात.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या मोवाड गावात महापुराने काही क्षणात होत्याचे नव्हते केले. यात २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती.

या गावाला वर्धा माय (नदी) चा आशीर्वाद. गावात संपन्नता व समृद्धी होती. ‘मोवाड सोन्याचं कवाड’ अशी ख्याती पंचक्रोशीत होती. दही, दुधाची मोठी बाजारपेठ, नदी परिसरातील सुपीक शेतजमिनीमुळे शेतकरी सधन, मजुरांच्या हातालाही काम, बेरोजगारीचा गंध नाही. हातमागाचे जवळपास ४५० मानके सतत सुरू असायचे.

जिल्ह्यातील पहिली नगर परिषद मोवाडच. वर्धा व कोलार नदीच्या मधोमध एखाद्या बेटाप्रमाणे मोवाड वर्धा नदीच्या काठावर वसले होते. दरवर्षी वर्धा नदीला पूर यायचा. पुरापासून गावाच्या संरक्षणाकरिता १९१८ साली मोवाड येथील समाजसेवक पापामियाँ यांनी मरामाय ते विठ्ठल मंदिरापर्यंत दगड चुन्याचा धक्का बांधला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५९ मध्ये विठ्ठल मंदिरापासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून तीन किलोमीटर लांब, १२ फुट रुंद व १६ फुट उंच धक्का (बांध) निर्माण केला होता. यापूर्वी आलेल्या दोन पुरांना या दोन्ही धक्क्यांनी थोपवून गावाचे संरक्षण केले होते.

यामुळे आला महापूर

वर्धा नदी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आहे. मध्य प्रदेशातील मुलताईजवळ वर्धा नदीवर चंदोरा बांधाची निर्मिती करण्यात आली होती. मध्य प्रदेशातही सतत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चंदोरा बांधाच्या क्षमतेपेक्षा पाणी जास्त जमा झाल्यामुळे तो २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर फुटला व वर्धा नदीला महापूर आला. वर्धा नदीवर मोवाड गावाच्या वरच्या भागात रोजगार हमी योजनेतून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु पुनर्बांधणीचे काम रेंगाळतच राहिले. इथेच घात झाला.

नदीने पात्र बदलेले तासाभरात सारे संपले !

चंदोरा बांध फुटल्यामुळे नदीच्या पात्रात पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान पाण्याचा मोठ्या प्रमाणात लोंढा आला व त्यामुळे धक्का फुटून नदीने आपले पात्रच बदलविले. दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे कोलार नदीलाही पूर आला होता. गाव चोहीबाजूने पुराच्या पाण्याने वेढले. पहाटे ५.३०च्या दरम्यान गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली. प्रत्येक जण जीव वाचविण्याकरिता आश्रय शोधायला लागला. अवघ्या तासाभरात होत्याचे नव्हते झाले. कित्येक लोक पाण्यावर तरंगत वाहून जाऊ लागली.

आश्रयित ग्रामस्थांसह इमारतही वाहून गेली

मोवाड येथे पोलीस चौकीच्या समोरील भागात बंडू गुप्ता यांची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीमध्ये १०० ते १५० लोकांनी आश्रय घेतला होता. ती इमारत ज्याप्रमाणे बांबूचे ताबूत पाण्यावर तरंगत वाहून जाते अगदी तशीच फाउंडेशनसह वाहून गेली होती. काहींनी मारोतराव ठोंबरे यांच्या इमारतीवरही अनेकांनी आश्रय घेतला होता. तिही इमारत पूर्णत: वाहून गेली. कुटुंबीयांसह आश्रयितांना जलसमाधी मिळाली.

Web Title: Usha: Yesterday it was dark night ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.