कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:19+5:302021-08-27T04:10:19+5:30
नागपूर : चष्म्याचा वापर टाळण्यासाठी तर कुणी फॅशन म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र लेन्स वापरताना विशेष ...
नागपूर : चष्म्याचा वापर टाळण्यासाठी तर कुणी फॅशन म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र लेन्स वापरताना विशेष काळजी न घेतल्यास डोळ्याला खाज येणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे, याशिवाय जंतूसंसर्ग किंवा बुबुळाला इजा होण्याची भीती असते.
डोळे हा फार नाजूक अवयव आहे. यामुळे डोळ्याची योग्य काळजी घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. वयाची पहिली दहा वर्षे डोळ्यांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची असतात. या वयात डोळ्यांची वाढ योग्य झाली नाही, तर ते कायमचे कमजोर होतात, ‘लेझी आय’सारखे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आईवडिलांनी मुलांच्या डोळ्याची नियमित तपासणी करवून घेण्यास प्राधान्य द्यावे. शिवाय, डोळे आणखी सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधने वापरतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
- चष्म्याला करा बाय बाय
नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, ‘सिलेंड्रिकल’ आणि ‘बायफोकल’ अशा दोन्ही लेन्स बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे चष्म्याचा नंबर असलेले कुणीही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू शकतात. परंतु ज्यांचे ‘डोळे कोरडे’ आहेत त्यांनी लेन्स वापरू नये. कॉन्टॅक्ट लेन्सच्या वापराने डोळे खराब होतात, असा काहींचा समज आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास त्याचा काहीही त्रास होत नाही.
- ही काळजी घेणे आवश्यक
नेत्ररोग तज्ज्ञानुसार, आपल्या डोळ्याला सूट होईल अशाच कॉन्टॅक्ट लेन्सची निवड करावी. लेन्सवर घाण बसणार नाही, काढ-घाल करताना त्या खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी. आठ ते नऊ तासापेक्षा जास्त वेळ लेन्स वापरू नये. आठवड्यातून एक दिवस लेन्सला सुटी द्यावी. डोळे लाल झाले असतील तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नये. पोहताना कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या असतील तर गॉगल घालायलाच हवा. कॉन्टॅक्ट लेन्स झोपताना चुकूनही डोळ्यात ठेवू नये. लेन्सचे सोल्युशन काहीसे महाग असते. मात्र दर एक दिवसाने हे सोल्युशन बदलणे गरजेचे असते.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापूर्वी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या
डोळे फार अमूल्य आहेत. यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापूर्वी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचा आहे. लेन्समुळे डोळे लाल होत असतील, खाज सुटली असेल तर कुठलीही तडजोड करू नये, ‘नंतर जाऊ नेत्ररोग तज्ज्ञाकडे...!’ अथवा ‘बघून घेऊ..काय होते...!’ असा दृष्टिकोन ठेवू नये.
- डॉ. रवी चव्हाण, प्रमुख नेत्ररोग विभाग मेयो
- वर्षातून एकदा नेत्ररोग तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक
‘ड्राय आय’ असणाऱ्यांनी ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरू नये. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरणाऱ्यांनी वर्षातून एकदा नेत्ररोग तज्ज्ञाकडून तपासणी करायला हवी. लेन्स वापरताना डोळे लाल होत असतील, डोळ्यातून पाणी जात असेल तर तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरताना स्वच्छतेची काळजी घेणेही गरजेचे आहे.
- डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोग तज्ज्ञ