धनादेशाचा गैरवापर करून पावणेदोन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:14 AM2019-02-20T00:14:17+5:302019-02-20T00:15:05+5:30
एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
खारा एका गॅस कंपनीत कार्यरत आहेत. ते रामदासपेठमध्ये राहतात. आयसीआयसीआय बँकेत त्यांचे खाते असून, काही दिवसांपूर्वी अचानक त्यांचे सीमकार्ड ब्लॉक झाले. सोमवारी त्यांनी आपले सीमकार्ड बदलवून सुरू करून घेतले. तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून १ लाख ७० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता, त्यांच्या नावाचे नवीन चेकबुक बँकेतून दुसऱ्याच कुणीतरी काढून घेतले आणि चेकवर बनावट स्वाक्षरी करून १ लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खारा यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, एखाद्याचा मोबाईल क्रमांक मिळवून कंपनीला फोन करणे, माझा मोबाईल हरविला अशी थाप मारून तो मोबाईल नंबर कंपनीतर्फे ब्लॉक करून घेणे, त्यानंतर बँकेतून चेकबुक मिळविणे आणि बनावट स्वाक्षरी करून चक्क पावणेदोन लाखांची रक्कम विड्रॉल करण्याचा हा घटनाक्रम पोलिसांनाही चक्रावून टाकणारा ठरला आहे. एखाद्या ग्राहकाच्या खात्याचे चेकबुक शहानिशा न करता दुसऱ्या व्यक्तीकडे दिलेच कसे गेले, हा पहिला प्रश्न असून, चेकबुक दिल्यानंतर मोठी रक्कम विड्रॉल करताना सही त्याच व्यक्तीची आहे की नाही, याचीही शहानिशा बँक अधिकाऱ्यांकडून न होणे, हा प्रकारच गंभीर आहे. विशेष म्हणजे, आरोपीने ही रक्कम चंद्रपुरातील एका बँकेतून काढली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.