जुगलबंदीने हरपले भान, रसिकांनी घेतली तालसंगमाची अद्भुत अनुभूती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 10:40 AM2022-12-05T10:40:01+5:302022-12-05T10:42:37+5:30
‘क्लासिकल ॲण्ड बियॉण्डमध्ये तबला, मृदंगम, व्हायोलिन आणि तालवाद्यांच्या स्वरांचा अनोखा समागम
नागपूर : कलाकाराच्या संवेदनशील क्रियेचा आणि वाद्यांवरून उमटणाऱ्या नादमय प्रतिक्रियेचा सृजनात्मक खेळ म्हणजे संगीत आणि या सांगीतिक बैठकीला रसिला प्रतिसाद देतो तो रसिक... असा हा कलाकार आणि रसिकांचा अनोखा संवेदनशील संगम रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात बघता आला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन आणि त्यांच्या संगतीला असलेले संगीत अकादमी पुरस्कार प्राप्त व्हायोलिनवादक बंधू गणेश व कुमारेश, तालवादक व संगीतकार व्ही. सेल्वागणेश, मृदंगमवर पत्री सतीशकुमार हे सारेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे होते. रंगमंचावरील या साऱ्यांच्या उपस्थितीने आता वाद्यांची जुगलबंदी रंगणार, असा भास उस्ताद झाकीर हुसैन यांनी निर्माण केला आणि रसिकांनी आपल्या आसनकक्षा घट्ट केल्या.
वाद्यांतून निघणारे नाद आणि तालाचे स्वर जसजसे सभागृहाचा ताबा घेत होते. तसतसे या सगळ्या स्वरांचा संगम कधी झाला हे उपस्थितांना कळलेच नाही. सारेच संगीतसृजनाच्या या अखंड सागरात आपादमस्तक बुडालेले होते आणि रसिकांच्या तोंडून एकच स्वर बाहेर पडला ‘वाह उस्ताद... क्या बात है’
लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी बाबूजी उपाख्य स्व. जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने लोकमत टाईम्सच्या वतीने रविवारी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘क्लासिकल ॲण्ड बियॉण्ड’ या संगीतसभेचे आयोजन करण्यात आले. ताल आणि स्वरांना अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात ‘वर्णम’ या वादनप्रकाराने करण्यात आली. याद्वारे संगीताच्या नऊ रागांना आमंत्रित करण्यात आले. यात पल्लवी, अनुपल्लवी आणि चरणम् या संगीत तऱ्हेचा समावेश होता. त्यानंतर वादनाचे अष्टचक्र असणाऱ्या राग बहुधारीमधील आदिताल पाचही वादकांनी पेश केला. गणेश यांनी स्वत:ची रचना असलेली आदितालयोगी राग आदित्यमध्ये सादर केली.
पत्री सतीशकुमार यांनी मृदंगमवर निसर्गाच्या संरचनेचा भाव जागवला आणि कणाकणात शिवतत्त्व कसे सामावले आहे, याचे नादवर्णन केले. राग कल्याण वसंतममधील रूपक तालात असलेली आलाप रचना व्हायोलिनवर सादर करण्यात आली. सेल्वागणेश यांनी तालवाद्यातील खंजिरावर उत्कृष्ट वादन सादर केले. संगीतसभेची सांगता ‘रागम् तालम् पल्लवी’ने करत उस्ताद झाकीर हुसैन यांनी सोबत्यांसोबत सभागृहात उपस्थित रसिकांना संगीतसागरात चिंब भिजवले. संचालन श्वेता शालगावकर यांनी केले.
संगीत साधकांनी प्रज्ञावंतांविषयी व्यक्त केली आपुलकी
- ‘क्लासिकल ॲण्ड बियॉण्ड’साठी नागपूरकर रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्याचे कारण म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून उस्ताद झाकीर हुसैन भारतात नव्हते. ते भारतात आले आणि पहिलाच कार्यक्रम नागपुरात ‘लोकमत’साठी सादर केला. या कार्यक्रमासाठी रसिक महाराष्ट्राबाहेरून आणि परदेशातूनही आले होते. उस्तादजींसोबतच इतर कलावंत मंडळी रंगमंचावर अवरताच सर्वांनी टाळ्यांचा गजर करत उभे राहून अंतरमनातून स्वागत केले. नागपूरकर रसिकांच्या अशा व्यक्त होण्याच्या आपुलकीने उस्तादजींसोबतच सर्व कलावंत भारावून गेले होते. कार्यक्रमात तर एकीकडे वादनाचे स्वर आणि दुसरीकडे रसिकांकडून निघणाऱ्या करतलध्वनीचे स्वर निघत होते आणि दोन्ही एकमेकांत मिसळून जात होते.
लोकमतला सूरतालाचे प्रणाम : उस्ताद झाकिर हुसैन
- संगीतसंध्येच्या प्रारंभी सर्व वादक कलावंतांनी पहिली प्रस्तुती दिल्यानंतर पद्मभूषण तबला वादक उस्ताद झाकिर हुसैन यांनी नागपूरकरांशी संवाद साधला. सर्वांना कोटी-कोटी प्रणाम करताना त्यांनी आजचा दिवस आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी संगीताच्या भाषेत आपल्या भावना व्यक्त करताना, संगीतातील ‘तिहाई’प्रमाणे आज जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे ‘तिहाई’मधील पहिला टप्पा असून दुसरा टप्पा म्हणजे लोकमतच्या स्थापनेचे ५० वर्षे आणि तिसरा टप्पा अर्थात संगीत अकादमी पुरस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सर्व वादक कलावंतांनी जी पहिली प्रस्तुती दिली त्याला ‘वर्णम’ म्हटले जाते. स्वरांच्या विभिन्न चालींना वर्ण म्हणतात. अशा तऱ्हेने ‘वर्णम’द्वारे आज आम्ही जवाहरलाल दर्डा, लोकमत आणि संगीत अकादमी परिवाराला सूरतालाने अभिवादन केल्याचे उस्ताद झाकिर हुसैन यांनी सांगीतले. ‘तिहाई’नंतर वादन कला ‘सम’वर पोहोचते. हीसुद्धा एक विशिष्ट गोष्ट आहे. कारण आज परफाॅर्म करणारे व्हायोलीन वादक बंधू (गणेश व कुमारेश) यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोघेही आनंद पसरवताना सुमधुर व्हायोलीन सादर करत असल्याचे उस्ताद म्हणाले.
संगीतातून वाहतो मानवतेचा झरा : विजय दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा म्हणाले मानवतेचा संदेश देणारे संगीत नागपूरच्या रसिकांमध्ये भरले आहे. माझी पत्नी ज्योत्स्ना दर्डा संगीताची चाहती होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत अवॉर्ड’चे वितरण करण्यासोबतच गीत-संगीताची मैफल सजवली जाते. यंदाचे वर्ष हे माझे वडील लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबूजींच्या सन्मानार्थ एक नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला असून हे नाणे तयारही झाले आहे. बाबूजींच्या नावावर पोस्टाचे तिकीटही काढण्यात आल्याची माहिती विजय दर्डा यांनी यावेळी दिली. पद्मभूषण तबला वादक उस्ताद झाकिर हुसैन यांच्या बोटांतून गंगा-यमुना वाहतात. ते गंगा-जमुनी तहजीबचे प्रवर्तक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते भारतात यावे, यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. परंतु, कोरोना महामारीमुळे ते अमेरिकेच्या बाहेर येऊ शकत नव्हते. जेव्हाही मी हिंदुस्थानात येईन तेव्हा पहिला कार्यक्रम लोकमतचाच असेल, असे त्यांनी वचन दिले होते आणि आज ते नागपुरात आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी पद्मभूषण उस्ताद झाकिर हुसैन, लोकमत एडिटोरियल बोडचि चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, इंद्रियाच्या संचालिका पूर्वा कोठारी, आ. अॅड. अभिजित वंजारी, आ. समीर कुणावार, शशी व्यास, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, माजी खा. डॉ. विकास महात्मे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनीष कोठारी, किरीट भन्साली, माजी खा. अजय संचेती, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिटरी, अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडात्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, प्रिन्सिपल चिफ कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स के. एम. बाली. विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, पोलिस उपमहानिरीक्षक [नक्षल सेल) संदीप पाटील, ज्योती व्यास, डीसीपी अनुराग जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
उस्ताद म्हणाले.....आता जेवायला चला!
वादनाची खुमखुमी रसिकांवर अशी काही चढली होती की, कार्यक्रमाच्या समाप्तीनंतरही रसिक उभे राहून बराच वेळपर्यंत टाळ्या वाजवत होते. अखेर उस्ताद झाकिर हुसैन यांना आता कार्यक्रम संपला आहे. आता पोटाची वेळ झाली आहे. जेवायला चला, असा सांकेतिक इशारा प्रेक्षकांना करावा लागला. तरी प्रेक्षकांचा उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. प्रत्येकाला त्यांची भेट घ्यायची होती. स्वाक्षरी आणि सेल्फीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत होते.