‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार
By सुमेध वाघमार | Published: June 3, 2024 07:20 PM2024-06-03T19:20:33+5:302024-06-03T19:20:59+5:30
Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन
सुमेध वाघमारे
नागपूर : गर्भाशयाचा मुखाचा कर्करोगासह अन्ननलिका, स्तन, डोके व मानेच्या कर्करोगावर रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त अत्याधुनिक ‘ब्रेकीथेरपी’ यंत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्थापन झाले. या यंत्राची अचूक उपचारात मदत होत असल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
‘एम्स’ नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ. पी.पी. जोशी यांनी सांगितले, कर्करोगाच्या बहुसंख्य रुग्णांना रेडिओथेरपीची गरज पडते. ‘एम्स’मध्ये कर्करोगाच्या रुग्णांना एकाच छताखाली उपचाराची ही सोय उभी केली आहे. ‘ब्रेकीथेरपी’ यंत्रामुळे रेडिएशनचे उच्च डोस थेट कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहचतात. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशींचे नुकसान कमी होते. अधिक अचूक उपचारांमुळे कर्करोग बरा होण्याची शक्यता वाढते. ‘एम्स’मध्ये केवळ विदभार्तीलच नव्हे तर शेजारील राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी ब्रेकीथेरपी यंत्रासोबतच ‘लिनियर एक्सीलरेटर’ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्करोगाच्या रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी विशेष कार्यक्रम देखील आहेत.
उपचारासोबतच रुग्णांचीही काळजी
‘एम्स’मध्ये अत्याधुनिक उपचारासोबतच कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘श्रावण बाळ केंद’्र रुग्णांच्या सेवेत सुरू आहे. या शिवाय, ‘अंकुर’ या स्वयं मदत गटाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक पाठबळ दिले जाते. ‘तिलोत्तमा’ या उपक्रमातून कर्करोगा विषयी जनजागृती केली जाते.