नागपूरच्या मेडिकलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:14 PM2019-01-31T23:14:55+5:302019-01-31T23:18:05+5:30
वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. साधारण येत्या दोन महिन्याच्या आत गर्भाशय प्रत्यारोपण केले जाईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. साधारण येत्या दोन महिन्याच्या आत गर्भाशय प्रत्यारोपण केले जाईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
नेत्र, मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणानंतर आता नागपुरात लवकरच गर्भाशयाचे प्रत्यारोपण होणार आहे. हे प्रत्यारोपण देशातील शासकीय रुग्णालयात पहिले ठरणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे मातृत्वाच्या हक्कापासून वंचित राहणाऱ्या महिलांना मातृत्वसुखाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, डॉ. निसवाडे यांच्या पुढाकारामुळेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे हे पहिले हॉस्पिटल ठरले आहे.
डॉ. निसवाडे यांनी सांगितले, स्वीडन, अमेरिकेनंतर आता भारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी होत आहे. त्यामुळे गर्भाशय प्रत्यारोपणाला आता विशेष महत्त्व आले आहे. प्रत्यारोपणाकरिता लागणारी आवश्यक परवानगीचा प्रस्ताव शुक्रवारी आरोग्य खात्याकडे पाठविली जाणार आहे. याची पूर्वकल्पना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्यांनीही तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गर्भाशय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर ही शस्त्रक्रिया करणार आहेत. मेडिकलमध्ये दोन गर्भाशयदाता आणि ते स्वीकारणाºया महिला रुग्णाची नोंदही झाली आहे. शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. गर्भाशय हे ‘ब्रेन डेड’ म्हणजे, मेंदू मृत किंवा जिवंत महिलांकडून दान करता येऊ शकते.
मातृत्वाच्या प्रतीक्षेत महिलांसाठी आशेचा किरण
गर्भाशयाच्या प्रत्यारोपणामुळे मातृत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो महिलांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. गर्भाशय प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भारतात पहिली शस्त्रक्रिया दुर्बिणीचा वापर करून झाली. गर्भाशय प्रत्यारोपणामुळे स्वत:च्या पोटात मूल वाढविणे महिलेस शक्य झाले आहे. तसेच रक्ताच्या नात्यातील दात्यालाच गर्भाशयाचे दान करणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य असल्यामुळे या दानाचा बाजार होण्याचीही शक्यता कमी आहे. आता हे तंत्रज्ञान नागपूर मेडिकलसारख्या शासकीय रुग्णालयात होणार असल्याने त्याचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असून त्याचा खरा उपयोग होईल.