‘उत्तरदायित्व’ अन् ‘ती फुलराणी’ने जिंकली रसिकांची मने
By आनंद डेकाटे | Published: July 12, 2024 07:06 PM2024-07-12T19:06:30+5:302024-07-12T19:07:02+5:30
Nagpur : महावितरणच्या राज्य नाट्य स्पर्धेला सुरूवात
आनंद डेकाटे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘ती फुलराणी’ आणि ‘उत्तरदायित्व’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली.
पुणे प्रादेशिक संघातर्फे पु. ल. देशपांडे लिखित आणि श्रीकांत सनगर दिग्दर्शित ‘ती फ़ुलराणी’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कसदार अभिनय, उत्कृठ संवाद आणि पार्श्वसंगित यामुळे या नाटकाने रसिकांची दाद मिळविली. एखादी गोष्ट शिकण्यासाठी शिकणारा आणि शिकवणारा दोघांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे असते. याची जाणीव या नाटकातून होते. तर दुपारच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर परिमंडळातर्फे डॉ.गणेश शिंदे लिखित व श्रावण कोळनूरकर दिग्दर्शित 'उत्तरदायित्व' हे नाटक सादर करण्यात आले. गावखेडयातील शेतकरी कुटुंबाची परिस्थितीमुळे होणारी होरपळ या नाटकातून सादर करण्यात आली.
या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट व नाट्य कलावंत देवेंद्र दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी होते. तर मुख्यालयातील देयक व महसुल विभागाचे परेश भागवत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, छत्रपती संभाजी नगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोट, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, ग्राहक विषयक सलागार गौरी चंद्रायण, मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, जेष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक सलिम शेख यांचेसह परिक्षक प्रभाकर आंबोने, विनोद तुंबडे आणि मंजुश्री भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक मधुसूदन मराठे यांनी केले. मेघा अमृते आणि अमित पेढेकर यांनी संचालन केले. तर अर्चना पाटील यांनी आभार मानले.
नाट्य स्पर्धेतून कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव - सुहास रंगारी
नाटकाचे सादरीकरण हे एक टिम वर्क आहे. प्रयोगादरम्यान कलाकारांचे एकमेकांना दिलेली साथ, सहयोग यावर नाटकांचे यशापयश अवलंबून असते. दैनंदिन महावितरणचे काम करतांनाही हे सुत्र तंतोतंत लागू होत असल्याने, नाट्य कलावंत आणि कर्मचाऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहाने प्रत्येक प्रयोगातील चांगल्यागोष्टी आत्मसात करत प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी यावेळी केले.