नागपुरात व्ही. शांताराम चित्रपट महोत्सव : शनिवारी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:45 PM2019-08-08T22:45:04+5:302019-08-08T22:48:50+5:30

१० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कविकुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप‘आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

V. Shantaram Film Festival in Nagpur.: Starts on Saturday | नागपुरात व्ही. शांताराम चित्रपट महोत्सव : शनिवारी प्रारंभ

नागपुरात व्ही. शांताराम चित्रपट महोत्सव : शनिवारी प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बापू का बायोस्कोप‘ रसिकांसाठी मेजवानी ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि पुणे फिल्म फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कविकुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप‘आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने विभूषित व्ही. शांताराम यांनी मूकपटाच्या काळात कारकिर्दीस सुरुवात केली. पहिले प्रभात व नंतर राजकमल या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले. ऐतिहासिक व पौराणिक विषयांशिवाय सामाजिक आशय असलेले चित्रपट म्हणजे त्या काळात उचललेले एक क्रांतिकारी पाऊल होते. कुंकू, शेजारी, माणूस, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारह हाथ यासारखे आशयघन चित्रपट त्यातील सामाजिक जाणिवांमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गाजले. तंत्रज्ञानाची उत्तम समज, नाविन्याची आस आणि संगीताची जाण यामुळे त्यांच्या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला. अमरभूपाळी, धर्मात्मा, झनक झनक पायल बाजे, पिंजरा हे अभिरुचीसंपन्न करणारे त्यांचे चित्रपट कलातीत मानले जातात.
‘बापू का बायोस्कोप‘ हा चित्रपट महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी मेजवानी ठरणार आहे. शनिवारी १० ऑगस्टला दुपारी १ वाजता उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता ‘शेजारी’ व सायंकाळी ५ वाजता ‘कुंकू’ हे चित्रपट दाखविण्यात येईल. रविवारी ११ ऑगस्टला सकाळी १० वाजता ‘नवरंग’, दुपारी १ वाजता ‘दो आँखे बारह हाथ’ चित्रपट दाखविण्यात येईल. दो आँखे बारह हाथ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका करणारे फिल्मगुरु समर नखाते यावेळी प्रेक्षकांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहतील. अभिजित रणदिवे व अभिजित देशपांडे हे चित्रपट समीक्षकसुद्धा प्रत्येक चित्रपटानंतर रसिकांशी संवाद साधतील. महोत्सवाचा समारोप ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाने होईल. गायत्रीनगर येथील परसिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात होणाऱ्या व नि:शुल्क असणाऱ्या महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अभिजित बांगर व चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते,विलास मानेकर, अशोक कोल्टकर, डॉ. उदय गुप्ते आदी उपस्थित होते.

Web Title: V. Shantaram Film Festival in Nagpur.: Starts on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.