वाकीत दोघांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:58 AM2017-07-29T01:58:53+5:302017-07-29T01:59:34+5:30
नागपंचमीची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आलेल्या मित्रांपैकी दोघांना वाकीच्या कन्हान नदीत जलसमाधी मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खापा : नागपंचमीची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आलेल्या मित्रांपैकी दोघांना वाकीच्या कन्हान नदीत जलसमाधी मिळाली. यापैकी एकाचा मृतदेह घटनेनंतर अवघ्या काही वेळातच सापडला. दुसºयाचा शोध घेणे दुसºया दिवशीही सुरूच होते. जलसमाधी मिळाल्याची ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. मृत दोघेही सावनेर येथील रहिवासी होते.
रजत मुन्ना पन्नामे (१७, रा. पहलेपार, सावनेर) आणि राहुल विक्की मेंढुले (२१, रा. रेल्वे स्टेशन रोड, सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. विशाल श्यामलाल पराडकर (१७), शुभम बैजुलाल नरेटे (२२), जितेंद्र बैजुलाल नरेटे (२३), राहुल विक्की मेंढुले (२१), रजत मुन्ना पन्नामे (१७) आणि प्रकाश जीवनलाल मेंढुले (२३) हे सहा मित्र नागपंचमीची सुटी असल्याने सावनेर येथून वाकी येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास आले. वाकी दरगाह येथे दर्शन घेतल्यानंतर ते कन्हान नदीकडे गेले. तेथे आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यामुळे आधी दोघे आणि नंतर दोघे असे चार जण नदीत उतरले. मात्र पाण्याच्या धारेत रजत आणि राहुल हे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब इतरांच्या लक्षात येताच ते रजत - राहुलच्या दिशेने गेले. मात्र पाहता - पाहता ते दोघेही पाण्यात बुडाले. उर्वरित चौघांनीही त्या दोघांचा शोध घेतला.
मात्र आढळून आले नाही. अखेर याबाबत खापा पोलिसांना सूचना देण्यात आली.
खापा पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान तीन तासांच्या प्रयत्नानंतर राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नागपूरच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले होते. अंधार झाल्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास शोध मोहीम थांबविण्यात आली.
घटनास्थळी तहसीलदार राजू रणवीर, ठाणेदार अनामिका मिर्झापुरे हे ताफ्यासह हजर होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. या प्रकरणी खापा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप वासाडे, सहायक उपनिरीक्षक मुकुंदा लोंदे करीत आहे.
वेणा दुर्घटनेच्या स्मृती ताज्या
वेणा जलाशयात गेल्या ९ जुलै रोजी अशाचप्रकारे एका दुर्घटनेत आठ तरुणांना जलसमाधी मिळाली. वाकी येथील घटनेनंतर पुन्हा त्या घटनेच्या स्मृती ताज्या झाल्या. पिकनिकसाठी गेलेल्या १० तरुणांपैकी आठ जणांना बोट उलटल्याने वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली. त्यात नावाडी आणि दोन भाऊ असे तिघे बचावले. मृतांमध्ये राहुल जाधव, अंकित अरुण भोस्कर, परेश काटोके, रा. नागपूर, रोशन खांदारे, अक्षय मोहन खांदारे, अतुल भोयर,पंकज डोईफोडे व प्रतीक आमड या आठ जणांचा समावेश होता. तर अमोल मुरलीधर दोडके , रोशन मुरलीधर दोडके व नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे हे तिघे बचावले. वाकी येथेही अशाचप्रकारे सहा मित्र फिरायला गेले होते. ते नदीपात्रात जाताच त्यांना पाण्याच्या प्रवाहाने ओढत नेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.