रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:09 AM2020-12-24T04:09:01+5:302020-12-24T04:09:01+5:30
श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : तालुक्यातील प्रत्येकाचा विविध कामांकरिता संबंध येणाऱ्या तहसील कार्यालयाच्या आस्थापनेत ४६ मंजूर पदांपैकी ...
श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तालुक्यातील प्रत्येकाचा विविध कामांकरिता संबंध येणाऱ्या तहसील कार्यालयाच्या आस्थापनेत ४६ मंजूर पदांपैकी १५ पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. या सर्व परिस्थितीचा कामावर परिणाम होत असून सर्वसामान्यांना झळ साेसावी लागत आहे. विशेषतः संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेतील नायब तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने निराधार लाभार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. सामान्य प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.
सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या नरखेड तालुक्यात १२७ गावे आहेत. सहा महसुली मंडळात विभागलेल्या तालुक्यात ३९ तलाठी साझे आहेत. खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर, वृद्ध नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व इतर नागरिकांचा महसुली कामानिमित्त तहसील कार्यालयाशी संबंध येतो. जिल्ह्यात नरखेड तालुका भौगोलिक क्षेत्रात सर्वात मोठा आहे. तालुकास्थळावरून शेवटच्या गावचे अंतर १०० किमी आहे. परंतु रिक्त पदांमुळे कार्यालयीन कामाचा वेग मंदावला असून, नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. शिवाय त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
तहसील कार्यालयात सामान्य आस्थापनेत नायब तहसीलदाराची २ पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक रिक्त आहे. महसूल सहायक १० पदे असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. अन्न व पुरवठा आस्थापनेत महसूल सहायक ४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत. शिपाई ६ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. संजय गांधी योजना आस्थापनेत नायब तहसीलदाराचे एक पद रिक्त आहे. महसूल सहायकाचे १ पद असून तेही रिक्त आहे. इंदिरा गांधी योजना आस्थापनेत अव्वल कारकून व महसूल सहायक प्रत्येकी एक अशी दोन पदे मंजूर असून दोन्ही पदे रिक्त आहेत. तलाठी आस्थापनेत मंडळ अधिकारी ७ पदे मंजूर असून, २ पदे रिक्त आहेत. तलाठी ३९ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत.
....
१५ पदे रिक्त
तहसील कार्यालयाच्या आस्थापनेत ४६ पदे मंजूर आहेत. परंतु नायब तहसीलदार १, महसूल सहायक ६ , मंडळ अधिकारी २, अव्वल कारकून १, शिपाई ३ व तलाठी २ अशी एकूण १५ पदे रिक्त आहेत.
....
रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येताे. असे असले तरी नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सर्व कर्मचारी करतात. तहसील आस्थापनेतील रिक्त पदांबाबत प्रशासनाला अवगत केले असून, लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील.
- डी. जी. जाधव, तहसीलदार, नरखेड.