आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त जागा भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 03:02 PM2021-01-25T15:02:42+5:302021-01-25T15:03:50+5:30
Nagpur News सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. शनिवारी मेयो, मेडिकलचा आढवा घेण्यासाठी ते नागपुरात आले असताना बोलत होते.
डॉ. यड्रावकर यांनी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सर्व वरीष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. मेडिलकचा आढावा घेत उपाययोजनाबाबत काही सूचनाही केल्या. येथून ते मेयो रुग्णालयात गेले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. यड्रावकर म्हणाले, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील ताण आणि रिक्तपदे लक्षात घेऊन मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
-फायर व विद्युत आॅडिटसाठी निधी देणार
भंडारा अग्निकांड भविष्यात होऊ नये यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर व विद्युत आॅडिट करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी दिला जाईल. तशी तरतूदही करण्यात आल्याचे डॉ. यड्रावकर म्हणाले.
-मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटल प्रश्न निकाली काढू
मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत. एका जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकल्प रखडत चालला आहे. याबाबत बोलताना डॉ. यड्रावकर म्हणाले, कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच निकाली निकाली निघणार आहे. याचा फायदा गरीब रुग्णांना होईल.