पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरू करण्याला रिक्त पदांचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:24+5:302021-05-31T04:07:24+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : मध्य भारतातील एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला २६ वर्षे झाली आहेत. परंतु रिक्त पदांचा खोडामुळे पदव्युत्तर ...
सुमेध वाघमारे
नागपूर : मध्य भारतातील एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला २६ वर्षे झाली आहेत. परंतु रिक्त पदांचा खोडामुळे पदव्युत्तर वैद्यकीय संस्था निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशपासून अद्यापही दूर आहे. विशेषत: ‘युरोलॉजी’, ‘सीव्हीटीएस’ व ‘अॅनेस्थेसिया’ विभागात प्राध्यापकच नाही. पात्र सहयोगी प्राध्यापकांना बढती न दिल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम रखडल्याचे वास्तव आहे. लोकप्रतिनिधीने यात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्यास ‘सुपर’मध्ये पदव्युत्तर डॉक्टरांची संख्या वाढेल सोबतच, रात्री अपरात्री येणा-या रुग्णांना उपचारही मिळतील.
कोरोनाच्या संसर्गात डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. कोरोनाच्या लाटा येतच राहणार असल्याने या रुग्णांसोबत इतरही आजाराची गुंतागुंत घेऊन येणा-या पोस्ट कोविड रुग्णांची संख्या वाढणार आहे. परिणामी, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांवरील रुग्णांचा भार वाढणार आहे. यामुळे शासनाने आतापासून याची तयारी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रिक्त पदे भरण्यासाठी मंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले होते. त्यावेळी सहायक प्राध्यापकांना तदर्थ सहयोगी प्राध्यापक करण्यात आले. परंतु पुढे ही प्रक्रिया राबविण्यातच आली नाही. परिणामी, याचा फटका पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वप्न बाळगून असलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांसोबत गरजू रुग्णांना बसत आहे.
-पात्र प्राध्यापकाअभावी ‘एमसीएच’ची तपासणी रखडली
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘युरोलॉजी’ विभागात ‘एमसीएच’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी २०१९ मध्ये मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेतला. डॉ. संजय कोलते यांना या विभागाचे प्राध्यापक दाखविण्यात आले. परंतु ते कंत्राटी असल्याने तर तदर्थ सहयोगी प्राध्यापक डॉ. धनंजय सेलुकर यांना प्राध्यापकाच्या पात्रतेसाठी तीन महिन्यांचा कालावधी कमी पडल्याने तपासणी रखडली. दरम्यान, डॉ. सेलूकर यांना आठ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचा बढतीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु कोरोनामुळे तो थंड बस्त्यात पडला आहे. ‘सीव्हीटीएस’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश दास व अॅनेस्थेशिया विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वली हे प्राध्यापक पदासाठी पात्र ठरत असतानाही बढती न मिळाल्याने त्यांचा विभाग पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून अद्यापही दूर आहेत.
-‘डीएमईआर’कडून प्रस्तावाचा पाठपुरावा करणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावतीने शासकीय रुग्णालयाचे सल्लागार असलेले डॉ. विरल कामदार म्हणाले, ‘सुपर’ला पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. यासाठी विविध विषयात ‘डीएम’ व ‘एमसीएच’ हे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू होणे विद्यार्थी व रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या संदर्भात मेडिकलकडून पाठविण्यात येणा-या प्रस्तावाचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) पाठपुरावा केला जाईल.