२१,७८८ लाभार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:32+5:302021-04-02T04:09:32+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. सोबतच बँक कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षकांना ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. सोबतच बँक कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षकांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ संबोधून त्यांनाही लसीकरणात सामावून घेतले. यामुळे पहिल्या दिवशी ३० हजारांपर्यंत लसीकरण होण्याची अपेक्षा होती; परंतु शहरात ११,२२८ तर ग्रामीणमध्ये १०,५६८ असे एकूण २१,७८८ लसीकरण झाले. धक्कादायक म्हणजे फ्रंट लाईन वर्करमध्ये पत्रकार व छायाचित्रकारांना वगळण्यात आले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यात ‘हेल्थ वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून आरोग्य सेवेत काम करणारे व पोलीस कर्मचाऱ्यांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ संबोधून लसीकरणात समावेश करण्यात आला. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण हाती घेण्यात आले. चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिक व मनपा कर्मचारी, पोलीस, उपद्रव शोध पथक, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, रेल्वे, बँक, बीएसएनएल, डाक, भारतीय खाद्य महामंडळ, विद्युत विभाग, शिक्षक, एलपीजी कर्मचारी, इंसिडेंट कमांडर, आदी कर्मचाऱ्यांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ दाखवून त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यासाठी शहरामध्ये ४६ खासगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आले. यामुळे ३० हजारांवर लाभार्थ्यांचे लसीकरण होण्याची अपेक्षा होती; परंतु २१,७८८ लसीकरण झाले. यात ४५ ते ६० वर्षांच्या आतील शहरात ६३३१, तर ग्रामीणमध्ये ४५०७ लाभार्थी होते. फ्रंट लाईन वर्करमधून पत्रकार व छायाचित्रकारांना वगळण्यात आल्याने त्यांच्यामधून रोष व्यक्त होत आहे.