२४४ केंद्रांवर आजपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:26+5:302021-04-01T04:08:26+5:30
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना सोय : शहरात ८१, तर ग्रामीणमध्ये १६३ केंद्रे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र ...
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना सोय : शहरात ८१, तर ग्रामीणमध्ये १६३ केंद्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आजपासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयांसह २४४ केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. यात नागपूर शहरात ८१, तर ग्रामीणमध्ये १६३ केंद्रांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून त्यांची संख्या वाढविली जाणार आहे.
नागपुरात आतापर्यंत २,१८,५२८ नागरिकांनी लसीकरण केले आहे. यामध्ये ३७,४४३ आरोग्यसेवक, २५,०८७ फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील १,०२,५५५ नागरिक आणि विविध आजाराने पीडित ३२,१९५ नागरिकांनी लस घेतली आहे. आता १ एप्रिलपासून लसीकरणाच्या मोहिमेत ६.५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले आहे.
...
ऑनलाईन नोंदणी सुविधा
४५ वर्षे व त्यावरील नागरिकांनी आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेंसच्या माध्यमाने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल. नागरिकांना नोंदणीसाठी ँ३३स्र://६६६.ूङ्म६्रल्ल.ॅङ्म५.्रल्ल/ँङ्मेी वर ’ङ्मॅ्रल्ल करावे लागेल. ज्यांना ऑनलाईन नोंदणीमध्ये काही अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी मनपा झोन कार्यालयामधून नोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
..
६० वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस
लसीकरणात आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर, विविध आजाराने पीडित नागरिक, तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस साठी प्राथमिकता दिली जाईल. तसेच ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या नागरिकांना सुद्धा प्राथमिकता देण्यात येईल. खासगी रुग्णालयामध्ये शासनाद्वारे निर्धारित दर घ्यावे लागतील, तर शासकीय रुग्णालयामध्ये लस मोफत दिली जाणार आहे. ४६ खासगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
..
दोन नवीन लसीकरण केंद्र
मानेवाडा येथील शाहू गार्डन जवळील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, संजयनगर हिंदी मनपा शाळेजवळ डीप्टी सिग्नल प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू होत आहे.
...
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण
नागरिकांच्या सुविधेसाठी लसीकरणाची व्यवस्था दोन पाळीमध्ये शासकीय व मनपाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये बाबुलबन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, के. टी. नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केंद्राचा समावेश आहे. या केंद्रांवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. एन.जी.ओ.च्या प्रतिनिधींना शासकीय लसीकरण केंद्रात आरोग्य विभाग मनपा व शासकीय चमूंना मदत करण्याचे आवाहन केले, तसेच केंद्राची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे.