एका दिवसात ३६,५८४ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:01+5:302021-07-08T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर बुधवारी लसीकरणाला सुरुवात झाली. नागपूर शहरात एका दिवसात ३६,५८४ नागरिकांचे लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर बुधवारी लसीकरणाला सुरुवात झाली. नागपूर शहरात एका दिवसात ३६,५८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात मनपा व शासकीय केंद्रांवर ३३,४७० नागरिकांना लस देण्यात आली, तर खासगी केंद्रावर ३११४ नागरिकांनी लस घेतली.
दरम्यान, शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे आज गुरुवारी फक्त ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मनपा व शासकीय केंद्रांवर होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. शासन निर्देशानुसार ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला होता त्यांना दुसरा डोज देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केले जाईल. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या मनपाच्या आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहेत.
१८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.