गावा-गावात लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:02+5:302021-05-06T04:09:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यात आतापर्यंत केवळ ५० टक्के लसीकरण झाले असून, लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात नागरिकांचाही ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यात आतापर्यंत केवळ ५० टक्के लसीकरण झाले असून, लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात नागरिकांचाही प्रतिसाद मिळत नसल्याने आता गावा-गावात लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. तालुका प्रशासनाने विशेष माेहीम हाती घेतली असून, अधिकारी व पदाधिकारी घराेघरी भेटी देऊन नागरिकांमधील लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यातील आकाेली येथे बुधवारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. लसीकरणामुळे काेणतेही दुष्परिणाम हाेत नसून त्यामुळे हाेणारे फायदे नागरिकांना पटवून दिले. नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर केल्याने आकाेली येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची रिघ लागली व ४९ नागरिकांनी लस टाेचून घेतली. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती वामन श्रीरामे, सरपंच गजानन धांडे, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी देवेंद्र भूयार, नायब तहसीलदार रमेश पागाेटे, खंडविकास अधिकारी मनाेज हिरूडकर, पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, प्रभारी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. राजेश गिलानी, मंडल अधिकारी हिंदलाल उके यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित हाेते.
तितूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सीआपी बचतगट, पशु सखी, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी गावात घराेघरी फिरून जनजागृती केली व नागरिकांना लस घेण्यासाठी प्राेत्साहित केले.