व्हायलमध्ये डोस शिल्लक तरच, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:26+5:302021-03-24T04:09:26+5:30
नागपूर : गंभीर आजार नसलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांनाही १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली असली ...
नागपूर : गंभीर आजार नसलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांनाही १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी उद्या बुधवारपासून या लाभार्थ्यांना लस मिळण्याची शक्यता आहे. परंतु यात एकच अट आहे, ती म्हणजे, व्हायलमध्ये शवटचे डोस शिल्लक असतील आणि हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, को-मॉर्बिडीजचे रुग्ण किंवा ६० वर्षांवरील ज्येष्ठ लाभार्थी नसतील तर ते डोस वाया न जाऊ देता ४५ वर्षांवरील लोकांना दिले जातील, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र सरकारने वाढवले आहे. पूर्वी २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस देण्याच्या सूचना असताना आता ते ४ ते ६ आठवड्यापर्यंत त्याला नेण्यात आले आहे. यामागे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याची व जास्तीत लाभार्थ्यांना पहिल्या डोस देण्याची केंद्राची भूमिका आहे. परंतु या संदर्भात राज्याकडून अद्यापही कुठले निर्देश प्राप्त झाले नसल्याचे डॉ. चिलकर यांनी सांगितले. त्यांच्यानुसार, लसीच्या दुसरा डोसचा लाभार्थ्याला मेसेज आल्यावरच तो दिला जातो. यामुळे बुधवारी ‘को-विन’ वेबसाईटवर काय दिसून येते आता सांगणे कठीण आहे.
-शहरात केवळ ५० हजार डोस उपलब्ध
शहरात सध्याच्या घडीला ५० हजार डोस उपलब्ध असल्याच्या माहितीला डॉ. चिलकर यांनी दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, पुढील चार दिवस हे डोस पुरतील. या दरम्यान उपसंचालक आरोग्य विभाग शेजारच्या जिल्ह्यातून डोस उपलब्ध करून देतील. यामुळे तुटवडा जाणार नाही.